मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (18:03 IST)

मोदींचं कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा आवाहन

कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहता कुंभमेळा आता फक्त प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधू संतांना केलं आहे. पंतप्रधानांनी ट्वीट करून साधू संतांना हे आवाहन केलं.
 
त्यांनी लिहिलं, "जुना आखाडाचे पीठीधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी माझी आज फोनवर चर्चा झाली. आता दोन शाही स्नान पार पडले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, अशी प्रार्थना मी त्यांच्याकडे केली आहे. याने कोरोनाविरुद्धच्या लढाईला ताकद मिळेल"
 
साधूसंतांकडून प्रशासनाला होत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभारही मानले आहेत. स्वामी अवधेशानंद गिरी यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्या ट्वीटला उत्तर दिलं.
 
ते म्हणाले, "माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही आदर करतो. जीवाची रक्षा हे पुण्याचं परमोच्च कार्य आहे. कोव्हिडची परिस्थिती पाहून नागरिकांनी स्नानाला येणं टाळावं तसंच नियमांचं पालन करावं, अशी मी विनंती करतो."
 
गेल्या एका आठवड्यापासून कुंभमेळ्यात जमलेल्या भाविकांच्या संख्येवरून देशात जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतांश लोक कुंभमेळ्यावर टीका करताना दिसत आहेत. कोरोना काळात इतक्या मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणी जमा होणं धोकादायक ठरू शकतं, असा इशारा देण्यात येत आहे.
 
हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. झा यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ते 14 एप्रिलदरम्यान कुंभमेळ्यात 1664 कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी 35 जण साधू आहेत. डॉ. झा यांच्या मते येथील पॉझिटिव्हिटी रेट 0.29 टक्के इतकं आहे.