शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (15:34 IST)

उत्तरकाशी बोगद्यातील बचावकार्यत पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे; सर्व 41 मजूर सुरक्षित

uttarkashi tunnel
उत्तरकाशीच्या सिलक्यालातील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्याच्या मोहिमेला दिवस पूर्ण झाले आहेत. आज 11वा दिवस आहे.41 मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या बचाव मोहिमेतील बुधवारचा ( 22 नोव्हेंबर) दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
 
या बोगद्यातील ढिगाऱ्यात 39 मीटर ड्रिल करण्यात बचावकर्ते यशस्वी झाले आहेत.
 
अंदाजे एकूण 60 मीटर एवढं एकूण ड्रिलिंग आहे.
 
त्यामुळे बुधवारी रात्री (22 नोव्हेंबर) किवां गुरुवारी ( 23 नोव्हेंबर) सकाळपर्यंत उत्तरकाशी बोगद्यातील बचाव कार्य पूर्ण होऊ शकतं, अशी माहिती रस्ते आणि वाहतूक खात्याचे अतिरिक्त सचिव (तांत्रिक) महमूद अहमद आणि उत्तराखंड राज्याचे सचिव निरज खैरवाल यांनी बुधवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच मजुरांना बाहेर काढण्याची आशा निर्माण झाली आहे.
 
रस्ते आणि वाहतूक खात्याचे अतिरिक्त सचिव (तांत्रिक) महमूद अहमद म्हणतात, "कोणतेही अडथळे नसतील तर आज रात्री किंवा उद्या सकाळी काही मोठी बातमी मिळू शकते.
 
ही आनंदाची बाब आहे. ढिगाऱ्यासोबत लोखंडी रॉडही आला आहे. या लोखंडी रॉडमुळे मशिन ड्रिलिंगमध्ये अडथळा आला नाही हे बर झालं. पाइपलाइन टाकण्याच्या मध्यभागी आमच्यासाठी कोणतीही अडचण निर्माण झाली नाही."
 
महमूद अहमद पुढे म्हणतात की, "ड्रील झालं की 6 फुटांचा पाईप आम्ही पूश करतो, याला वेळ लागत नाहीत. तर पहिल्या पाईप ड्रिल केल्यावर त्याला वेल्डिंग करुन दुसरा पाईप जोडवा लागतो.
 
हे वेल्डिंग खूप मजबूत असणं आवश्यक आहे. या दोन पाईपची जोडणी करताना कराव्या लागणाऱ्या वेल्डिंगला चार ते पाच तास लागतात. हा वेळ कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या हा वेळ आम्ही साडेतीन तासांवर आणला आहे "
 
या बचाव कार्याचे नोडल अधिकारी असलेले उत्तराखंडचे सचिव निरज खैरवाल म्हणाले की, "एक मायक्रोफोन आणि स्पीकर आम्ही बोगद्यातील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहचवला आहे.
 
त्याद्वारे आमचे डॉक्टर प्रत्येक मजुराशी संवाद साधत आहेत. मानिसक आरोग्य महत्त्वाचं आहे. म्हणून मानसोपचारतज्ज्ञ ही संवाद साधत आहेत.
 
अन्नपदार्थ आम्ही त्यांच्यापर्यतं पोहोचवले आहेत. ताजं अन्न ही आम्ही देतोय. अंडर गार्मेंट, ब्रश, टॉवेल या गरजेच्या वस्तू आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत."
 
उत्तरकाशीच्या बोगद्यातून पहिला व्हीडिओ
पीटीआय या वृत्तसंस्थेनं बोगद्याच्या आतील एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओत मजूर टनलच्या आत उभे राहून बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
त्यामुळे आत अडकलेल्या लोकांची परिस्थिती अद्याप ठीक असल्याची आशा वाढली आहे.
 
इंडोस्कोपिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही दृश्यं घेण्यात आली आहेत. हा कॅमेरा सहा इंचाच्या फूड पाईपलाईनच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. मजुरांनी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे हेल्मेट परिधान केले असल्याचं व्हीडिओत दिसत आहे.
 
पाईपलाइनमधून येणारं अन्न घेत ते एकमेकांशी चर्चा करत असल्याचंही यातून दिसत आहे. हे व्हीडिओ फुटेज अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.
 
Published By- Priya Dixit