शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (09:23 IST)

पंतप्रधान कल्याणला येणार, प्रशासनाची जोरदार तयारी

मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ डिसेंबरला कल्याण दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे अधिकारी आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मोदींचा ताफा ज्या रस्त्याने येणार आहे, तसेच मोदींचा हा कार्यक्रम ज्या फडके मैदानात होणार आहे, तेथील रस्ते चकाचक करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. कायम कल्याण येथील रस्त्यावरील खड्ड्याची दखल न घेणारे पालिका प्रशासनाचे अधिकारी आता चक्क स्वतः लक्ष देत खड्डे डांबरीकरण करून ते बुजवून घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेने गांधारी ते लालचौकीपर्यंतच्या डांबरी रस्त्याची डागडुजी केली असून याची पाहणी स्वतः आयुक्त गोविंद बोडके करत आहेत.
 
कल्याण-पडघा मार्गावरील बापसई गावानजीकच्या मोकळ्या जागेत मोदींचे हेलिकॉप्टर लँड होणार यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या लँडिंग आणि टेकऑफमध्ये अडथळा होऊ नये म्हणून यासाठी तिथे लोंबकळणाऱ्या विजेच्या तारादेखील हटविण्याचे काम करण्यात आले आहे.