बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2017 (14:36 IST)

नितीशकुमार काहीतरी करणार याची कुणकुण होतीच

नितीश कुमार भाजपला जाऊन मिळणार, हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच मला माहिती पडले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी म्हटले की, नितीश यांनी बिहारमधील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यापूर्वी नितीश मला भेटले होते. मात्र, तेव्हा त्यांनी या निर्णयाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. मात्र, तरीही गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला नितीश कुमार असे काहीतरी करणार, याची कुणकुण होतीच, असे राहुल यांनी सांगितले. बिहारच्या जनतेने जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी नितीश कुमार यांना मते दिली होती. मात्र, वैयक्तिक राजकारणासाठी नितीश यांनी त्याच शक्तींशी हातमिळवणी केली आहे. भारतीय राजकारणाची हीच खरी समस्या आहे. येथे लोक स्वार्थासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि यावर कोणाचेही नियंत्रण नसते, असे राहुल यांनी म्हटले.