शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल गांधी : पक्षाध्यक्षपद सोडलं, भारत जोडो यात्रा काढली, आता विरोधी पक्षनेतेपद, 'हे' आहेत राजकीय अर्थ

भारताच्या 18 व्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि रायबरेलीतून खासदार म्हणून निवडून आलेले राहुल गांधी विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसनं मंगळवारी (25 जून) यासंदर्भात घोषणा केली.राहुल गांधी यांनी 2004 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी कोणतंही पद घेणं टाळलं होतं. पुढे त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आलं. मात्र, 2019 मध्ये पक्षाच्या पराभवानंतर त्यांनी तेही पद सोडलं होतं.
 
त्यानंतर पक्षात कुठलंही पद न घेता, त्यांनी पक्षकार्यात सक्रियता दाखवली. 'भारत जोडो' यात्रेसारखी देशव्यापी पायी चळवळ त्यांनी यशश्वीरित्या पूर्ण केली.
 
2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आधीच्या दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत चांगलं यश मिळालं आणि आता राहुल गांधी पुन्हा जबाबदारीच्या पदावर विराजमान होऊ पाहतायेत. त्याचाच भाग म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद.
 
काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी (25 जून) विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली. त्यामुळे लोकसभेला 10 वर्षांनी विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे.
बुधवारी (26 जून) लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाषण केलं.
 
ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले, "सरकारकडे राजकीय ताकद आहे, पण विरोधकही भारतातील जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत. किंबहुना, यावेळी विरोधक भारतातील लोकांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व अधिक ताकदीने करत आहेत."
 
ओम बिर्लांना उद्देशून राहुल गांधी पुढे म्हणाले की, "विरोधक तुम्हाला संसद चालवण्यास मदत करतील. सहकार्यावर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. विरोधकांचा आवाज संसदेत ऐकायला येणं खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की, विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही. भारतातील जनतेचा आवाज दडपून संसद कशी चालवता येईल, हा मोठा प्रश्न आहे. पण घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे ही लोकसभा अध्यक्षांची जबाबदारी आहे."
संसदेत दशकभरानंतर 'विरोधी पक्षनेता'
गेल्या दोन निवडणुकांमध्ये (2014 आणि 2019) काँग्रेसला संसदेत 10 टक्केही जागा (54 जागा) मिळाल्या नाहीत. अशा स्थितीत काँग्रेसला सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करता आला नाही. 2014 मध्ये काँग्रेसकडे 44, तर 2019 मध्ये 52 जागा होत्या. यावेळी काँग्रेसकडे 99 जागा आहेत. तसंच, काही अपक्षांनाही पाठिंबा दिलाय.
 
राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनतील, असा अनेकांना अंदाज होता. काँग्रेस कार्यकारिणी समितीत राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद घेण्यास सूचवण्यात आल्यानंतर तर या अंदाजावर शिक्कामोर्तबच झालं. त्यानंतर फक्त राहुल गांधींनी हे पद स्वीकारणं ही औपचारिकता बनली.
 
4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्याचवेळी काँग्रेस मुख्यालय असलेल्या दिल्लीस्थित 24 अकबर रोड येथील काँग्रेस समर्थक म्हणू लागले, 'यावेळी राहुल गांधी संसदेत संपूर्ण विरोधकांचा आवाज बनतील.'
 
राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच संसदेत घटनात्मक पद स्वीकारलं आहे. त्यांच्या आई सोनिया गांधी त्यांच्यासोबत लोकसभेत नसण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत आणि राहुल गांधी त्यांच्या रायबरेली (उत्तर प्रदेश) मतदारसंघातून निवडून आले आहेत.
 
या वेळी प्रियांका गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत असल्याने लोकसभेत त्या त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक जिंकली होती, पण त्यांनी रायबरेलीमधून खासदार राहणं पसंत केलं.
 
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता, तेव्हा राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
 
यानंतर सोनिया गांधी काही वर्ष हंगामी अध्यक्ष राहिल्या. या काळात असे अनेक प्रसंग आले, जेव्हा राहुल गांधींना अध्यक्षपद परत घेण्यास सांगितलं गेलं. पण ते आपल्या पक्षात कोणतंही पद घेणार नाहीत यावर ठाम राहिले.
 
यानंतर 2022 मध्ये पक्षांतर्गत हायव्होल्टेज ड्रामा झाला आणि मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे अध्यक्ष झाले.
 
पाच वर्ष या मुद्द्यावर ठाम राहिल्यानंतर आता इतक्या वर्षांत प्रथमच राहुल गांधी महत्त्वाचं पद स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेसचं राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किदवई यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, विरोधी पक्षनेतेपदामुळे राहुल गांधींची जबाबदारी घेण्याची प्रतिमा उजळेल.
 
किदवई म्हणाले, "विरोधी पक्षाचा नेता शॅडो पंतप्रधान असतो. ते केवळ संपूर्ण विरोधी पक्षाचेच नेतृत्व करत नाहीत तर अनेक महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये पंतप्रधानांसोबत असतात. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील भाषणबाजी पाहिली तर लक्षात येईल दोघेही एकमेकांविरुद्ध टोकदार विधाने करतात. अशा परिस्थितीत पंतप्रधानांसोबत बसून निर्णय घेणं राहुल गांधींसमोरचं आव्हान असेल, पण त्यांना एक परिपक्व नेता म्हणून स्वत:ला आणखी मजबूत करायचे असेल, तर त्यांना हे करावं लागेल."
 
विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची जबाबदारी काय असेल?
संसदेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ते केवळ संसदेतील सर्व विरोधी पक्षांचा आवाज असतात असं नाही तर त्यांना स्वतःचे अधिकार आणि विशेषाधिकारही असतात.
 
विरोधी पक्षाचा नेता हा सार्वजनिक लेखा, सार्वजनिक उपक्रम आणि अंदाज समिती यासारख्या अनेक महत्त्वाच्या समित्यांचा एक भाग असतो.
 
संयुक्त संसदीय समित्या आणि निवड समित्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.
 
या निवड समित्या अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, लोकपाल, तसेच निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष यासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करतात.
विरोधी पक्षनेता हे कॅबिनेट दर्जाचं पद आहे. या पदाचे स्वतःचे असे फायदे आहेत.
 
जो कोणी विरोधी पक्षनेते पद घेतो, त्याला वेतन आणि दैनंदिन भत्ते दिले जातात. वेतन भत्ते, पेन्शन अधिनियम 1954 च्या कलम 3 नुसार हे भत्ते दिले जातात. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळतो.
 
जेव्हा राहुल गांधींनी पद घेण्यास नकार दिला होता...
2004 मध्येच राहुल गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरले.
 
राहुल गांधी यांनी 2004 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. राहुल गांधींचे वडील राजीव गांधी अमेठीतून निवडणूक लढवायचे.
 
डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना राहुल गांधी खासदार म्हणून संसदेत होते. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा खासदार होते. मात्र, वाजपेयींची विरोधी पक्षनेता म्हणून कारकीर्द राहुल गांधींना नीट पाहता आली नाही. याचं कारण वाजपेयींची तब्येत बरी नसायची आणि ते संसदेत फारसे यायचे नाहीत. अशावेळी विरोधी पक्षनेता म्हणून लालकृष्ण अडवाणी होते.
राहुल गांधी त्यांच्या सरकारमध्ये 10 वर्ष लोकसभेचे खासदार होते आणि गेल्या 10 वर्षांपासून ते विरोधी पक्षाचे खासदार आहेत.
 
2004 ते 2014 या काळात काँग्रेस सत्तेत असताना राहुल गांधी मंत्री झाले नाहीत आणि काँग्रेस सत्तेबाहेर असताना विरोधी पक्षनेते होण्याइतपतही विजय मिळवू शकले नाहीत.
 
राहुल स्वतःच्या इच्छेने मंत्री झाले नाहीत आणि विरोधी पक्षात असताना त्यांच्याकडे खासदार नव्हते, त्यामुळे विरोधी पक्षनेता बनू शकले नव्हते.
 
त्या तुलनेत त्यांच्या आई सोनिया गांधींनी मात्र थेट अटल बिहारी वाजपेयी यांचाच सामना केला होता आणि आता राहुल गांधी थेट नरेंद्र मोदींचा सामना करणार आहेत.
 
असं म्हटलं जातंय की, काँग्रेस आपल्या इतिहासातील सर्वात कठीण टप्प्यातून जात होती आणि या समस्येवर मात करण्यासाठी राहुल यांनी 7 सप्टेंबर 2022 पासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो यात्रा' सुरू केली. यानंतर राहुल यांनी मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 98 जागा मिळाल्या. म्हणजे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याएवढे खासदार काँग्रेसने निवडून आणले आहेत.
 
राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले, तेव्हा त्यांची मीडियात 'एक अनिच्छुक नेता' अशी प्रतिमा निर्माण झाली होती, पण आता ते थेट भिडताना दिसत आहेत.
 
सत्ता आणि राहुल गांधी
माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी 'वन लाइफ इज नॉट इनफ' या आत्मचरित्रात दावा केला होता की, राहुल गांधींनीच 2004 मध्ये सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यापासून रोखलं होतं.
 
नटवर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींना भीती होती की, त्यांच्या आईचीही हत्या होऊ शकते.
 
जानेवारी 2013 मध्ये जयपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेसचे उपाध्यक्ष करण्यात आले.
 
उपाध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी एआयसीसीच्या बैठकीला संबोधित करताना म्हणाले होते की, काल रात्री तुम्ही सर्वांनी माझे अभिनंदन केले. पण आई माझ्या खोलीत आली आणि माझ्या बाजूला बसून रडू लागली. तिला वाटतं की, सत्ता हे विष आहे.
 
"माझ्या आजीला तिच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मारले, जिच्यासोबत मी बॅडमिंटन खेळायचो, तिला एक मैत्रिण मानायचो. माझ्या वडिलांच्या बाबतीतही असंच घडलं, ज्यांनी लोकांच्या जीवनात आशा निर्माण केली होती. सत्तेच्या मागे धावायचे नाही तर सत्तेला जनते मध्ये घेऊन जायचं आहे."
 
राहुल गांधी 55 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी पक्षाची कमान सोडली आहे, मात्र आता विरोधी पक्षनेता बनून संसदेत पक्षाची कमान हाती घेतली आहे.
 
'भारत जोडो यात्रे'दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते, 'मी राहुल गांधींना खूप मागे सोडून आलोय. आता मी तो राहुल गांधी नाहीय.'
 
आगामी काळात राहुल गांधी लोकसभेत कसं काम करतात, विरोधी पक्षनेता म्हणून कोणते मुद्दे उचलतात, हे मुद्दे उचलताना ते किती आक्रमक होतात, या सर्वच मुद्द्यांवर संपूर्ण देशाचं त्यांच्याकडे लक्ष असेल. कारण हे पद त्यांची राजकीय कारकीर्दही ठरवणार आहे.
 
Published By- Priya Dixit