गोळीबार थांबवण्यास पाकिस्तानला भाग पाडू-राजनाथ
पाकिस्तानकडून झाडल्या गेलेल्या बंदुकीच्या एका गोळीला प्रत्युत्तर देताना भारत गोळ्यांची मोजदाद करणार नाही. आणखी काही काळ थांबा. पाकिस्तानला गोळीबार थांबवण्यास भाग पाडू, अशी ग्वाही आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू विभागात सीमाभागामध्ये राहणाऱ्या जनतेला दिली.
शस्त्रसंधी भंगाची आगळीक करत पाकिस्तानी सैनिक सातत्याने भारतीय हद्दीत मारा करतात. यापार्श्वभूमीवर, येथे झालेल्या सभेत बोलताना राजनाथ यांनी पाकिस्तानला इशारा देतानाच सीभा भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दिलासा दिला. मित्र बदलता येऊ शकतात; शेजारी नाही असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे. त्यामुळे पाकिस्तान आपला शेजारी असल्याचे प्रथम गोळीबार करू नका असे मी बीएसएफच्या प्रमुखांना सांगितल्याचे राजनाथ यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली देश बनला आहे. आता जगातील कुणीच भारताकडे कमजोर देश म्हणून पाहत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानी माऱ्यामुळे चार महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा क्षेत्रात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत राहणाऱ्या सुमारे 5 हजार भारतीय नागरिकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी जाऊन राहण्यास भाग पडले. त्यांच्या आश्रयासाठी सरकारने छावण्या उभ्या केल्या. या छावण्यांना भेट देऊन राजनाथ यांनी स्थलांतरितांशी संवाद साधला. यावेळी स्थलांतरितांनी सुरक्षेसाठी त्यांच्या घरांमध्येच बंकर्स उभारण्याची मागणी केली.