गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (09:33 IST)

मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या- नुपुर शर्मा

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांनी आपल्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
 
त्या म्हणाल्या आहेत की, "याआधी माझी मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले होते. माझ्या जीवाला आणखी धोका वाढला आहे. मला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळत आहेत,"
 
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले. त्यांच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्सही बजावले आहेत. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.
 
याआधीही नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले दिल्लीत हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्यावर यावेळी कडक टिप्पणी केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात पसरलेल्या जातीय हिंसाचाराला त्याच जबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
 
नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी याचिका मागे घेतली.