गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (23:35 IST)

दोन मुलांना मांडीत घेऊन आईने स्वतःला पेटवले, आई आणि एका मुलीचा मृत्यू

एका आईने आपल्या दोन मुलांना मांडीवर घेऊन स्वतःवर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याची हृदययद्रावक घटना मध्यप्रदेशातील पन्ना येथे घडली आहे. या घटनेत दीड वर्षाच्या मुलीसह आईचा दुर्देवी मृत्यू झाला.तर 4 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या चिमुकल्यावर उपचार सुरु आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना पन्ना जिल्ह्यातील सलेहा पोलीस स्टेशन हद्दीतील कठवारिया गावातली आहे. कठवारिया येथील रहिवासी राजेश कोरी हे शेळी चरण्यासाठी गेले होते आणि त्याचे आई-वडील भागवत कथेसाठी गेले होते. त्यांची पत्नी द्रौपदी 4 वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या मुलीसह घरी एकटी होती. एकटी असताना द्रौपदीने दरवाजा आतून बंद केला आणि मुला-मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि स्वत:वरही रॉकेल टाकले. यानंतर तिने दोघे मुलांसह स्वतःलाही पेटवून घेतले.
 
राजेशचे आई-वडील घरी आले असता आतून धूर निघत असल्याचे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आरडाओरड करून परिसरातील लोकांना गोळा केले आणि लोकांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता घराचे दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला. आगीत द्रौपदी आणि तिची  दीड वर्षाची मुलगी पूर्णपणे होरपळली आणि दोघांचाही मृत्यू झाला. आगीत भाजल्याने 4 वर्षांचा मुलगा वेदनेने रडत असताना त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ केल्याची बाबही समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पन्ना पोलीस अधीक्षक  यांचे म्हणणे आहे.