शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 5 एप्रिल 2017 (11:51 IST)

शिवसेना मंत्री, आमदारांची गुरुवारी बैठक

सत्तेत असूनही आमदारांची कामे होत नाहीत. भाजपचे सोडा शिवसेनेनेही मंत्री आमची कामे करत नाहीत, अशा तक्रारी वारंवार येत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 6) पक्षाच्या मंत्री व आमदारांची बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा असून शिवसेनाही विधानपरिषदेतील दोन मंत्र्यांसह दोन राज्यमंत्र्यांना डच्चू देणार, असे सांगितले जात आहे.
 
शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आपली कामे होत नाहीत. भाजपचे मंत्री ज्या प्रकारे आपल्या पक्षाच्या आमदारांना मदत करतात, त्याप्रमाणे शिवसेनेच्या मंत्र्यांकडून मदत मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्येही भाजपच्या मंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना बळ दिले; पण आपल्या मंत्र्यांकडून हवी तशी मदत झाली नसल्याची खदखद शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या मनात आहे. आमदारांनी याबाबतच्या तक्रारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुभाष देसाई व डॉ. दीपक सावंत यांना विश्राती, एकनाथ शिंदे यांना चांगले खाते, अर्जुन खोतकर यांना बढती आणि मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचंड मेहनत करणार्‍या अनिल परब यांना ‘बक्षीस’ दिले जाणार, अशी चर्चा आहे. 
 
अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 एप्रिल रोजी समाप्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीचा विषय सुरुवातीला शिवसेनेने उचलला असला तरी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेची अवस्था ‘ना इधर, ना उधर’ अशी झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाचे सूप वाजल्यावर या मागणीचे काय करायचे, हा प्रश्‍न शिवसेनेपुढे आहे. त्यामुळे आमदारांमधील धुसफूस कमी करणे, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भूमिका ठरवणे आणि कर्जमाफीच्या विषयावरील रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबईत शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार यांची बैठक बोलावली आहे. मंत्र्यांबाबत आमदारांची नेमकी काय नाराजी आहे, हे उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेत मोठे संघटनात्मक फेरबदल करतात का, हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.