‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत 105 विमानांद्वारे तब्बल 16 हजारहून अधिक प्रवासी दाखल
‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत हजारो भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं जात आहे. या अभियानांतर्गत विविध देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच आहे. मुंबईत आतापर्यंत 105 विमानांद्वारे तब्बल 16 हजार 234 प्रवासी दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईच्या प्रवाशांचा आकडा 6 हजार 9 इतका आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 5 हजार 398 एवढी आहे .
वंदे भारत अभियानांतर्गत 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 49 विमानांनी प्रवासी मुंबईत दाखल होणार आहेत. हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.
मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केलं जात आहे.