शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (19:51 IST)

राहुल गांधी पार्टी करतानाचा व्हीडिओ व्हायरल, भाजप नेत्यांची टीकेची झोड, काँग्रेस म्हणते...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ मंगळवार सकाळपासून भाजप नेत्यांच्या रडारवर आहे. या व्हीडिओत राहुल गांधी एका पार्टीत एका महिलेशी बोलताना दिसत आहेत. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे- ओळखा पाहू, कोण आहेत हे?
 
केंद्रीय कायदे मंत्री किरण रीजिजू यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, "पार्टी-सुट्ट्या-प्लेझर ट्रिप-वैयक्तिक विदेश वारी या देशासाठी नवीन नाही. सर्वसामान्य माणसाने असं काही केलं तर हरकत नाही. पण एक खासदार आणि राजकीय नेत्याने असं केलं तर"?
 
भाजप प्रवक्ता शहजाद जयहिंद यांनी ट्वीट करून लिहिलं आहे, "राजस्थान पेटलं आहे पण राहुलबाबा पार्टी करत आहेत. काँग्रेस पक्ष संपेल पण यांची पार्टी संपणार नाही. पार्टी टाईम नेता".
 
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "राहुल गांधी आपलं मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये गेले आहेत. मित्राच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी ते तिथे गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या निमंत्रणाविना तिथे केक कापण्यासाठी गेले होते. राहुल गांधी आगंतुकासारखे तिथे गेलेले नाहीत".
 
'संघाची माणसं राहुल गांधी यांना एवढं का घाबरतात?'
सुरजेवाला पुढे म्हणतात, "आज सकाळी मी उठलो तेव्हा आपले नातेवाईक, शेजारी, ओळखीचे यांच्यातर्फे आयोजित लग्न तसंच अन्य सोहळ्यात स्वतंत्रपणे सहभागी येत होतं. राहुल गांधी एका वैयक्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नेपाळला गेले आहेत. आजपर्यंत या देशात मित्रांना भेटणं, सोहळ्यात सहभागी होणं हा गुन्हा नव्हता. यापुढे लग्न करणं, अन्य लोकांच्या सोहळ्यात सहभागी होणं अपराध ठरू शकतो कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते आवडत नाही. तुम्ही ट्वीट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला आवश्यक बदल करता येतील."
 
राहुल गांधींच्या व्हीडिओवर भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्यासह अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
 
मात्र त्याचवेळी राहुल गांधी यांचं पार्टीत सहभागी होणं हा मोठा विषय नाही, विनाकारण त्याला महत्त्व देण्यात येऊ नये असा काहींचा सूर आहे.
 
मणिकम टागोर यांनी ट्वीट केलं आहे. ते लिहितात, "राहुल गांधी एखाद्या लग्नाच्या रिसेप्शन समारंभात सहभागी झाले तर यात वावगं काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं राहुल गांधी यांना एवढं का घाबरतात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोटं कशाला पसरवतात? प्रत्येकजण वैयक्तिक सणसमारंभात सहभागी होतो."
 
राहुल यांच्या दौऱ्यासंदर्भात नेपाळची वर्तमानपत्रं काय म्हणतात?
 
काठमांडू पोस्ट या नेपाळमधील वेबसाईटने राहुल गांधी यांच्या दौऱ्याचं वृत्त दिलं आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या व्हीडिओवरून राळ उडवण्याआधीच ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
 
2 मे रोजी छापून आलेल्या बातमीनुसार, राहुल गांधी मित्राच्या लग्नाला हजर राहण्यासाठी नेपाळमध्ये आले आहेत. राहुल गांधी मित्रांसह काठमांडूतील मॅरियट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. सोमवारी संध्याकाळी चार वाजता ते नेपाळमध्ये पोहोचले आहेत. राहुल गांधी तीन लोकांसह नेपाळला आले आहेत.
 
राहुल गांधींच्या मित्राचं नाव सुमनिमा उदास असून ते सीएनएनचे माजी प्रतिनिधी आहेत. सुमनिमा यांचं नीमा मार्टिन शेरपा यांच्याशी लग्न होत आहे.
 
आज हे लग्न होत असून, 5 मे रोजी रिसेप्शन होणार आहे. राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य काही भारतीय व्हीआयपी मंडळी या लग्नाला तसंच रिसेप्शनला उपस्थित राहू शकतात.
 
नेपाळच्या विदेशी मंत्रालयाचं काय म्हणणं?
बीबीसीच्या नेपाळी सेवेने राहुल गांधी यांच्या नेपाळ दौऱ्यासंदर्भात नेपाळच्या विदेश मंत्रालयाशी संपर्क केला.
 
नेपाळ विदेशी मंत्रालयाचे प्रवक्ते सेवा लामसाल यांनी सांगितलं की, "राहुल गांधी यांचा हा दौरा सरकारी तसंच औपचारिक स्वरुपाचा नाही. त्यामुळे यासंदर्भात आम्हाला काही माहिती नाही. राहुल गांधी सत्तेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विदेश दौऱ्याची नेपाळला माहिती असण्याचं कारण नाही."
 
नेपाळ पोलिसांनाही या दौऱ्याची माहिती नाही. नेपाळ पोलीसचे वरिष्ठ अधिकारी केसी यांनी सांगितलं की, "राहुल गांधी वैयक्तिक दौऱ्यासाठी आले आहेत. यासंदर्भात आम्हाला कल्पना नाही."
 
नेपाळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते राहुल गांधी या दौऱ्यात कोणत्याही नेत्यांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना भेटणार नाहीयेत.
 
राहुल यांच्या दौऱ्याला भाजपचा का आक्षेप?
राहुल गांधी यांच्या नेपाळ दौऱ्यावर भाजपने आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 मध्ये राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. त्यावेळीही भाजप आणि सहकारी पक्षांनी जोरदार टीका केली होती. त्यावेळी यात्रेदरम्यानचे राहुल गांधी यांचे फोटो काँग्रेसने शेअरही केले होते.
 
हे फोटो फेक असल्याचं भाजपने म्हटलं होतं. फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईट्सनी भाजप नेत्यांचे दावे तथ्यहीन असल्याचं स्पष्ट करत राहुल गांधी यांचे फोटो खरे असल्याचं म्हटलं होतं.