रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (14:43 IST)

अयोध्येतील राममंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर जुन्या रामललाच्या मूर्तीचं काय होणार?

Ram Mandir Ayodhya
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात प्रभू श्रीरामाची नवीन मूर्ती बसविण्यात येणार आहे.
मात्र पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रामललाच्या मूर्तीचं काय होणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही काही दिवसांपूर्वी हा प्रश्न विचारला होता.
 
सर्वप्रथम जनसंघ, नंतर भाजप आणि संघ परिवारातर्फे सातत्याने दावा केला जात होता की 22-23 डिसेंबर 1949 रोजी मूर्ती ‘प्रकट होणे’ ही एक दैवी घटना होती.
 
रामललाच्या मूर्तीला स्वयंभू म्हणणारी लोक वेळोवेळी श्री रामललाच्या प्रकट होण्याप्रकरणी अनेकांनी केलेल्या सहकार्याचं देखील कौतुक करत आलं आहे.
 
'रामललाच्या प्रकट होण्याच्या प्रसंगाबाबत’ जनसंघ आणि आरएसएसचे नेते कायम तत्कालीन जिल्हाधिकारी के. के. नायर आणि गीता प्रेसचे संचालक हनुमान प्रसाद पोद्दार यांच्या भूमिकेचं कौतुक करत आले आहेत.
 
गेल्या 74 वर्षांपासून रामलल्लाच्या रूपातील याच मूर्तीची पूजा आणि आराधना केली जात आहे.
 
स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट
 
खरंतर 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर नवाबी राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिश कायदा, शासन आणि न्यायव्यवस्था अस्तित्वात आली.
 
असं मानलं जातं की, याच काळात हिंदूंनी मशिदीचा बाहेरचा भाग ताब्यात घेऊन तिथे एक चौथरा बांधला आणि भजन-पूजा करायला सुरूवात केली, ज्या कारणामुळे तिथे भांडणं होत असंत.
 
यावरून दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये अनेकदा भांडणं आणि खटले झाले. हा प्रकार 90 वर्षांहून अधिक काळ चालू राहिला.
 
24 नोव्हेंबर 1949 पासून हिंदू संन्याश्यांनी मशिदीसमोरील स्मशानभूमी स्वच्छ केली आणि तिथे यज्ञ आणि रामायण पठण करण्यास सुरुवात केली.
 
वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे तिथे एक पोलीस चौकी उभारण्यात आली आणि सुरक्षेसाठी निमलष्करी दल पीएसी तैनात करण्यात आलं.
 
पीएसी तैनात असतानाही 22-23 डिसेंबर 1949 च्या रात्री महंत अभय रामदास यांनी घोषणा केली की मशिदीच्या आतमध्ये रामलला अवतरले आहेत, त्यानंतर असा प्रचार सुरू झाला की प्रभू श्रीराम यांनी तिथं प्रकट होऊन त्यांच्या जन्मस्थानाचा ताबा परत घेतला आहे.
 
अयोध्येतील जमिनीच्या मालकीचं प्रकरण नंतर जेव्हा न्यायालयात गेलं तेव्हा भगवान रामलला विराजमान खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते बनले.
 
रामललाची मूर्ती कशी अस्तित्वात आली आणि राम मंदिराशी संबंधित चळवळीमध्ये तिची काय भूमिका होती हे जाणून घेण्यासाठी आम्ही 1992 पासून रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी असलेले आचार्य सत्येंद्र दास यांच्याशी संवाद साधला.
 
रामलल्ला विराजमानचं महत्त्व
रामलल्ला विराजमानचं महत्त्व विषद करताना आचार्य सत्येंद्र दास सांगतात की, "नव्या प्रभू रामाचं भव्य मंदिर बांधलं गेलंय, मात्र सर्वांत जास्त महत्त्व याचं (1949 चे रामलला) आहे."
 
ते सांगतात, "अलाहाबाद उच्च न्यायालयातील वकील देवकी नंदन अग्रवाल यांनी रामलला विराजमानच्या मित्राच्या नात्याने रामलला तिथे बालकरूपात विराजमान असल्याचा खटला दाखल केला. कोर्टात याचा पुरावा सादर करण्यात आला. रामलला विराजमान असल्याच्या या पुराव्याचा आधार घेऊन कोर्टाने हीच राजमन्मभूमी असल्याचा निकाल दिला. त्यानंतर मंदिराचं बांधकाम सुरू झालं.”
 
आचार्य सत्येंद्र दास सांगतात की, “आजवर जितका वाद झालाय आणि कोर्टात जो खटला लढला गेला तो आधीपासूनच अस्तित्त्वात असलेल्या रामलला विराजमान या नावानेच लढला गेलाय. त्यांच्याच नावाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. आता मंदिर बांधलं गेलं असलं तरी पूर्वी ज्याप्रमाणे रामलल्ला विराजमानची पूजा आणि आराधना होत असे, तशीच यापुढेही होत राहील.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, जिथे नवीन रामलला ठेवले जातील, तिथे जुने रामलला ठेवण्यात येतील.
 
रामललाच्या पूजेबाबत आचार्य सत्येंद्र दास म्हणतात, "सर्व संप्रदाय त्यांच्या पद्धतीनुसार स्थानापन्न रामललाची पूजा आणि आराधना करतात. 16 मंत्रांच्या साहाय्याने एकेक वस्तू देवाला समर्पित केली जाते. रामासोबतच भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या सर्व भावांची पूजा होत आली आहे. आता जे भव्य मंदिर बांधण्यात आलंय त्यामध्येच त्यांची स्थापना केली जाईल."
 
आचार्य सत्येंद्र दास यांच्या म्हणण्यानुसार,
 
"पूर्वी मूर्ती घुमटाखाली (मशिदीच्या) होती. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा घुमट कोसळला, तेव्हा ती मूर्ती ताडपत्रीच्या तंबूत ठेवण्यात आलेली आणि तिथे पूजा सुरू होती. सध्या ती तात्पुरत्या लाकडी मंदिरात आहे. या लाकडी मंदिरात सर्व सोयीसुविधा आहेत. सध्या तिथेच पूजा करण्यात येत असून भाविकसुद्धा दर्शन घेत आहेत. नंतर ही मूर्ती भव्य मंदिरात हलविण्यात येईल.
 
जुन्या मूर्तीला 'उत्सव मूर्ती’चा दर्जा
आचार्य सत्येंद्र दास सांगतात की रामलला विराजमान ही एक चल मूर्ती मानली जाते. ही एक उत्सव मूर्ती आहे. याचाच अर्थ ज्या 51 इंचाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल ती अचल मूर्ती असेल आणि ती जागेवरून हलवता येणार नाही.
 
ते सांगतात की, रामलला विराजमान ही चल मूर्ती कोणत्याही उत्सवासाठी नेता येऊ शकते आणि उत्सवात सामिल झाल्यानंतर पुन्हा परत आणता येऊ शकते. उदा. अयोध्येतील मणिपर्वतावरील झूला उत्सवात रामललाला नेण्यात येतं.
 
आचार्य सत्येंद्र दास म्हणतात, "जर काही लोकांना त्यांचे विधी (धार्मिक कार्य) पार पाडण्यासाठी रामललाची मूर्ती तिथे असावी असं वाटत असेल, तर त्या विधीमध्ये रामलला विराजमानच्या मूर्तीचाही समावेश केला जाऊ शकतो. तिथे त्यांची पूजा आणि आराधना केली जाईल आणि मूर्ती पुन्हा माघारी आणण्यात येईल."
 
रामललाची वस्त्र शिवणारं कुटुंब
भागवत प्रसाद पहाडी हे 1985 पासून रामललाची वस्त्र शिवण्याचं काम करत आहेत, बाबूलाल टेलर्स या नावाने त्यांचं दुकान आहे.
 
भागवत प्रसाद म्हणतात, "वडिलांसोबत, आम्ही दोन भाऊ, तीन मुलं आणि एक सून मिळून रामललाची सेवा करत आलो आहोत. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि भक्तांकडून रामललासाठी वस्त्र बनवण्याची ऑर्डर त्यांना मिळते."
 
भागवत प्रसाद म्हणतात की जेव्हा रामलला घुमटात बसले होते, तेव्हा वर्षभरात फक्त एकच पोशाख बनवला जात असे.
 
ते सांगतात, “घुमट पडल्यानंतर रामलल्ला तंबूत आले तेव्हा केंद्र सरकारकडून वर्षातून सात वेळा रामललाचा पोशाख तयार केला जात असे."
 
पहाडी सांगतात की, रामलला विराजमानचा आकार फार मोठा नाहीए. ते 7 ते 8 इंचाचेच आहेत. प्रभू राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सर्व एकाच आकाराचे, बाल स्वरूपातील आणि गुडघ्यावर बसलेले आहेत.
 
रामलल्ला लाकडी मंदिरात आल्यापासून भागवत प्रसाद यांना दर्शनासाठी आलेल्या रामभक्तांकडून कपडे बनवण्याच्या ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चार भावांचे कपडे शिवण्याचं काम ते करतात.
 
भागवत प्रसाद सांगतात की विद्यमान मंदिरात हनुमान आणि शाळिग्राम देखील विराजमान आहेत. राम मंदिराचं भूमिपूजन झालं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात एका शिवलिंगाचीदेखील स्थापना केली होती.
 
भागवत प्रसाद सांगतात की देवाला रोज नवीन वस्त्र आणि ताजं अन्न मिळायला हवं.
 
22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी वस्त्र तयार करण्यासाठी अद्याप त्यांना ट्रस्टकडून कोणताही आदेश मिळालेला नाही, असं ते सांगतात.
 
नवीन मूर्तीबद्दल चंपत राय काय म्हणाले?
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यानी काही दिवसांपूर्वी एका भाषणात नव्या मूर्तीबाबत विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, "मूर्ती दगडाची आहे, उभी आहे आणि ती पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात आहे."
 
त्यांनी सांगितलेलं की, "पाच वर्षांच्या मुलाचा नाजुक हसरा चेहरा, डोळे आणि शरीर असलेली मूर्ती आहे. मूर्तीमध्ये देवत्व आहे, ती देवाचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे आणि तो एक राजाचा मुलगा देखील आहे. तर तो एक राजपुत्र आहे, त्यात देवत्व आहे, मात्र तो पाच वर्षांचा आहे. अशी मूर्ती तयार आहे."
 
ही मूर्ती 51 इंच उंच आहे. त्यावर थोडं कपाळ, थोडा मुकुट आणि प्रभावळ आहे.
 
चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार उंची ठरवताना असा विचार करण्यात आला की, दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्यदेव प्रकाशमान होतो आणि रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता प्रभू रामाचा जन्म झाल्याने त्यांच्यावर सूर्याची किरणं येऊन पडावीत.
 
चंपत राय म्हणाले की, देशातील अतिशय समर्थ अशा शास्त्रज्ञांच्या मदतीने याची खात्री केल्यानंतरच मूर्तीची उंची 51 इंच इतकी निश्चित करण्यात आलेय.
 
सुमारे दीड टन वजनाची ही मूर्ती पूर्णपणे दगडाने बनवण्यात आली आहे. मूर्तीला पाण्याने किंवा दुधाने आंघोळ घातल्यास मूर्तीच्या दगडाचा दुधावर किंवा पाण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ते पाणी प्यायल्यास त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये याची विशेष काळजी मूर्ती बनवताना घेण्यात आलेली आहे.
 
खरंतर तीन शिल्पकारांनी तीन वेगवेगळ्या दगडांच्या मूर्त्या तयार केल्या होत्या. यातील एक मूर्ती स्वीकारण्यात आली.
 
चंपत राय म्हणाले की, सर्व मूर्ती ट्रस्टकडेच राहतील. मूर्तीकारांनी खूपच तन्मयतेनं त्या मूर्ती तयार केल्या आहेत.
 
त्यांनी सांगितलं की, 16 जानेवारीपासून मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा विधी सुरू होतील आणि 18 जानेवारीला दुपारी गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना केली जाईल.
 
चंपत राय यांनी सोमवारी सांगितलं की, ज्या देवाची आराधना, सेवा आणि उपासना 70 वर्षांपासून (1950 पासून) अखंडपणे सुरू आहे, त्या देवांच्या मूर्तीही मूळ मंदिराच्या गर्भगृहात असतील.
आता ज्याप्रमाणे त्यांची पूजा आणि उपासना केली जात आहे, तशाच प्रकारे 22 जानेवारीपासून अखंडपणे केली जाणार आहे. जुन्या मूर्तीसोबतच श्री रामललाच्या नव्या मूर्तीलाही अंगवस्त्र परिधान केले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
 
राम दरबारासाठी वेगळ्या मूर्ती बनवल्या जाणार
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामाचा दरबार उभारण्यात येणार आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले की, जर तुम्ही रामाच्या दरबाराचं चित्र पाहिलं तर त्यात रामजी, सीताजी आणि हनुमानजींच्यादेखील मूर्ती असतील, पण त्या मूर्ती बनवण्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही."
 
प्रकाश गुप्ता सांगतात की, सध्या फक्त मुख्य मूर्ती तयार करण्यात आली असून तिची स्थापना करण्यात आली आहे आणि जेव्हा पहिला मजला तयार होईल, तेव्हा रामाच्या दरबारातील मूर्ती बनवून बसवल्या जातील.
 
हा दरबार कधी तयार होणार याबाबत प्रकाश गुप्ता म्हणतात की, “त्याला अजून वेळ आहे आणि ट्रस्टने त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या प्राणप्रतिष्ठा करणं हे मुख्य काम आहे. जेव्हा पहिला मजला तयार होईल, तेव्हा त्याची रचना केली जाईल."
 
ते म्हणतात, “मान्यतेनुसार ज्या चित्रात रामजी, सीताजी, लक्ष्मणजी, हनुमानजी, भरतजी आणि शत्रुघ्नजी आहेत त्याचप्रमाणे ते तयार व्हायला हवं. त्यामध्ये सिंहासन बनवून त्यावर मूर्ती बसवल्या जातील. सिंहासन संगमरवराचं बनवण्यात येईल आणि त्याला चांदीचा मुलामा दिला जाईल."
 
प्रकाश गुप्ता म्हणतात, "राम दरबार हा फक्त रामाचाच असेल, शकुंलात आणि इतर देवी-देवतांसाठी स्वतंत्र मंदिरं बांधली जात आहेत."
 
Published By- Priya Dixit