बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (20:36 IST)

भाजपशी दोन हात करणाऱ्या ममता बॅनर्जी RSS चं कौतुक का करतायेत?

Mamta Banerjee
"आरएसएस पूर्वी एवढी वाईट नव्हती. आणि आजही ती एवढी वाईट आहे असं मला वाटत नाही. आजही संघामध्ये असे काही लोक आहेत जे भाजपाप्रमाणे विचार करत नाहीत, त्यांना पाठिंबा देत नाहीत. एक दिवस ते याविरोधात बोलतील."
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी ममता बॅनर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात विधान करून पुन्हा चर्चेत आल्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 
भाजपाची मातृक संस्था असणाऱ्या संघाचं कौतुक केल्याबद्दल बऱ्याच जणांना आश्चर्य वाटत आहे. काँग्रेस आणि डावे हा व्हिडिओ शेअर करत त्याची चेष्टा करत आहेत.
 
पण ममता बॅनर्जींनी आरएसएसचं कौतुक पहिल्यांदाच केलंय असं नाहीये.
 
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ममता बॅनर्जींचा हा व्हिडिओ रिट्विट करत एक जुना ऐतिहासिक संदर्भ दिलाय.
 
ओवेसींनी ममता बॅनर्जींना 2003 सालची आठवण करून देत ट्विटमध्ये म्हटलंय की, "2003 मध्ये ममता बॅनर्जींनी आरएसएसला देशभक्त म्हटलं होतं. त्याच्या मोबदल्यात आरएसएसने त्यांना दुर्गा म्हटलं. आरएसएसला हिंदूराष्ट्र हवंय. आरएसएसचा इतिहास हा मुस्लीम विरोधातील द्वेषपूर्ण गुन्ह्यांनी भरलेला आहे."
 
गुजरातमधील दंगलीनंतर ममता यांनी संसदेमध्ये भाजपा सरकारची पाठराखण केली होती असं ही ओवेसींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
 
त्यांनी चिमटा काढत पुढं लिहिलंय की, "अपेक्षा आहे की तृणमूल काँग्रेसमधील मुस्लीम नेते ममता दिदींच्या या इमानदारीसाठी त्यांचं कौतुक करतील."
 
2003 मध्ये ममता नेमकं काय म्हणाल्या होत्या?
ओवेसींनी ज्या 2003 च्या घटनेचा उल्लेख केलाय ती घटना पण तेवढीच खुमासदार होती. ममता बॅनर्जी त्यावेळी एनडीए सरकारमध्ये सामील झाल्या होत्या. मात्र त्यांना सरकारमध्ये कोणतंही पद मिळालं नव्हतं.
 
2003 च्या सप्टेंबर महिन्यात 'कम्युनिस्ट टेररिझम' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हा सोहळा आयोजित केला होता पांचजन्यचे संपादक तरुण विजय यांनी. या सोहळ्याला ममता दिदींना बोलवण्यात आलं.
 
त्या प्रकाशन सोहळ्याला आरएसएसच्या अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. त्यात मदनदास देवी, मोहन भागवत आणि एचव्ही शेषाद्री होते. तर भाजपचे राज्यसभा खासदार बलबीर पुंजही आले होते.
 
'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ममता बॅनर्जीनी भाषण दिलं. त्या मंचावर उपस्थित नेत्यांसमोर म्हणाल्या, "जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला एक टक्का पाठिंबा दिला तरी आम्ही या 'लाल' दहशतवादाशी लढण्यात यशस्वी होऊ."
 
त्याच कार्यक्रमात तरुण विजय यांनी ममता बनर्जींना स्टेजवर भाषणासाठी आमंत्रित केलं आणि त्यांनी 'बंगालची दुर्गा' असं संबोधन वापरलं.
 
त्यानंतर तत्कालीन राज्यसभा खासदार बलबीर पुंज यांनीही ममता बॅनर्जी यांना 'दुर्गा' हेच संबोधन वापरलं होतं.
 
त्या घटनेवर बीबीसीशी बोलताना बलबीर पुंज सांगतात की, "त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सीपीएमची पकड होती. बंगालमध्ये त्यांना आव्हान देण्याची कोणाची हिंमत नव्हती. ममता बॅनर्जींनी ते धाडस केलं होतं."
 
"त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळेचं माझ्यासारख्या लोकांनी त्यांची प्रशंसा केली. खूपच साध्या राहतात त्या."
 
"मला आठवतंय, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ममता त्यांना भेटायला आल्या होत्या. त्या येताना लंगडत होत्या. मी आणि अटलजी बसलो होतो. मी विचारलं पायाला काय झालं तुमच्या? त्यावर त्या म्हटल्या, मी गाडीत बसत होते इतक्यात चप्पल तुटली, तुम्ही कोणालातरी सांगून ती नीट करू शकता का?"
 
"मी एका माणसाला बोलावून त्यांच्याच मापाची दुसरी चप्पल मागवून घेतली. त्यावर त्या म्हणाल्या, जुनीच नीट करून घेतली असती, नव्या चपलेची काही गरज नव्हती."
 
"त्यांच्या या साधेपणामुळे माझ्यासारखे लोक प्रभावित होतात."
 
वीस वर्षे उलटल्यावर या घटनेचा उल्लेख कशासाठी?
या घटनेला 2003 ते 2022 असा आता 20 वर्षांचा काळ लोटलाय. त्यावेळी ममता बंगालच्या डाव्यांशी लढत होत्या आता त्या भाजपशी लढत आहेत.
 
आता पश्चिम बंगालमध्ये ना डावे मजबूत राहिलेत ना काँग्रेसी. ना विधानसभेत ना लोकसभेत.
 
अशावेळेस ओवेसींनी ममता दिदींना या घटनेची आठवण करून देण्याचा काय हेतू असावा?
 
वरीष्ठ पत्रकार महुआ चटर्जी सांगतात, "ओवेसींच्या बोलण्याने असा काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये. बंगालच्या मुस्लिमांना चिथावणी देण्यासाठी ते अशा प्रकारची वक्तव्य करतात. त्यांच्या बोलण्याने ममता बॅनर्जी चिडतील असंही नाही."
 
मुस्लिम मतदारांची नाराजी ओढवून पश्चिम बंगालचं राजकारण करता येणं शक्य नाही. बंगालच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची 30 टक्के लोकसंख्या आहे. आणि तिथल्या मतदारापासून ते प्रत्येक एका राजकारण्याला या गोष्टीची माहिती असते.
 
यावर महुआ विचारतात, "मुस्लिम मतदारांची किंमत जर तुम्हाला आम्हाला माहीत आहे तर मग ममता बॅनर्जी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतील असं वाटतं का? मुस्लिम वर्ग नाराज होईल असं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाहीये. त्या फक्त एवढंच म्हटल्यात की, आरएसएस मध्येही काही चांगले लोक आहेत. ममता बनर्जींच्या राजकारणाला टार्गेट करणाऱ्या ओवेसींची पात्रता काय? त्यांच्यावर तर भाजपची ए, बी, सी टीम असल्याचे आरोप होतात. त्यामुळे ओवेसींनी ममता यांच्यावर निशाणा साधला तरी काही फरक पडत नाही."
 
पण आत्ताच आरएसएसचा आठवण का?
यावर महुआ सांगतात, 20 वर्षांनंतरही आरएसएसची आठवण येणं साधी गोष्ट नाही. ममता बॅनर्जी मुरब्बी राजकारणी आहेत, त्याच्या तोंडून हे उगाच आलं नसणार.
 
आरएसएसची अशाप्रकारे आठवण काढणं हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे. त्या आपलं आपलं राजकारण करत आहेत. विरोधक काय म्हणतील याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नाहीये.
 
ममता बनर्जींनी केलेल्या वक्तव्याचं विश्लेषण करताना महुआ सांगतात, "बंगालमध्ये भाजपची खरी ताकद आरएसएस आहे. असं वक्तव्य करून भाजप आणि आरएसएस मध्ये तेढ निर्माण करायची जेणेकरून बंगालच्या भाजप मध्ये थोडी अस्वस्थता निर्माण होईल."
 
बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी 2017 मध्ये पश्चिम बंगाल मधील आरएसएसच्या विस्तारावर एक रिपोर्ट तयार केला होता.
 
बीबीसीच्या त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, पश्चिम बंगालमध्ये 2011 साली आरएसएसच्या 530 शाखा होत्या. तेच 2015-16 दरम्यान ही संख्या 1500 च्याही पुढे गेली होती.
 
2017 च्या मार्चमध्ये कोईम्बतूरला संघाचं अधिवेशन पार पडलं होतं. या अधिवेशनात "पश्चिम बंगालमधील हिंदूंची घटती संख्या आणि कट्टरतावादयांचा उदय" हा मोठा धोका असल्याचं घोषित केलं होतं.
 
तसं बघायला गेलं तर बंगाल कायमस्वरूपी हिंदू राष्ट्रवादाचं केंद्र राहिलंय. स्वामी विवेकानंदांपासून ते भारताची स्वातंत्र्याची चळवळ असो त्याची सुरुवात बंगाल मधूनच झाल्याचं दिसतं.
 
स्वातंत्र्य मिळवल्यानंतर देशाप्रती विचार करण्याची वृत्ती श्यामा प्रसाद मुखर्जींनी बंगालमधूनच देशभरात पोहोचवली.
 
अनेक दशकांपासून बंगालचं राजकारण जवळून पाहणारे पुलकेश घोष सांगतात, "2023 मध्ये पंचायत इलेक्शन पार पडणार आहेत. त्या निवडणुकीत तृणमूल आणि भाजप आमनेसामने आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला थोडं कमकुवत करण्याची गरज आहे. आता ज्या जागेवर भाजप आहे तिथं डाव्यांना आणण्याची तयारी ममतांनी चालवली आहे. त्यांना माहीत आहे की भाजपची खरी ताकद आरएसएसच्या ग्राऊंडवर्क मध्ये दडली आहे."
 
आरएसएसची स्तुती करून ममता मुस्लिम मतदारांचा रोष ओढवून घेत आहेत का? त्यांच्या अशा विधानांमुळे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसेल का?
 
यावर महुआ म्हणतात की, राष्ट्रीय राजकारणात त्यांना आपला दरारा निर्माण करायचा आहे, ही गोष्ट खरी असली तरी आता 2022 सुरू आहे.
 
राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर बंगालमध्ये स्थैर्य आहे. नाहीतर दिल्लीतही ऑपरेशन लोटस राबवण्याच्या चर्चा आहेत. आम आदमी पार्टीला 70 पैकी 62 आमदारांचं समर्थन असूनही भाजपने आमदार फोडल्याचे आरोप झालेत.
 
बंगालमध्ये ईडी, आयटी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा दररोज छापेमारी करत आहेत. ममता यांचं सरकार भ्रष्टाचारी आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.
 
अशा स्थितीत पक्ष आणि सरकारला एकसंध ठेवण्याची कसरत ममता यांना करावी लागणार आहे.
 
त्यामुळे अशी विधान करून भाजपवर 'काउंटर अ‍ॅटॅक' करायचा आणि भाजपला सावरण्याची संधीच द्यायची नाही. सोबतच कोणत्याही आघाडीवर लढण्याची आपली तयारी आहे असं दाखवून द्यायचं हा ममतांच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग असल्याचं महुआचा यांना वाटतं.
 
महुआ यांना असं ही वाटतं की, ममता बनर्जींच्या राजकारणाला फक्त 'पश्चिम बंगाल' एवढ्यापुरतंच न पाहता, इतर राज्यात काय सुरू आहे आणि ममता काय करत आहेत या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.