गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (11:15 IST)

शाहजहान शेख यांना अटक, मासेमारी करणारा तरुण ते तृणमूलचा 'दबंग नेता' का आहे चर्चेत?

shahajahan shekh
गेल्या दीड महिन्यापासून फरार असलेले पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षाचे नेते शाहजहान शेख यांना संदेशखाली लैंगिक छळ प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या गावातील महिलांवर लैंगिक छळ केल्याचा आणि जमीन बळकावल्याचा आरोप आहे.
 
पोलिसांनी शेख यांना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मिनांखा या ठिकाणाहून अटक केली आहे. मिनांखा पोलिसांनी या अटकेची माहिती दिली आहे. पीटीआयने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातील तृणमूल काँग्रेसचा एक मोठा नेता आज राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चिला जातोय. तसं तर शाहजहान शेख याचं नाव देशातच काय तर पश्चिम बंगाल मध्येही फारसं माहिती नव्हतं. पण आता मात्र शाहजहान शेख हे नाव न्यूज चॅनल्स आणि इतर माध्यमांवर वारंवार झळकत आहे.
 
तृणमूलच्या काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठबळामुळे शाहजहान शेख हे त्या भागातील बडे नेते झाल्याचं म्हटलं जातं. शाहजहान शेख आणि त्यांचे दोन सहकारी शिबू हाजरा आणि उत्तम सरदार या तिघांनी मिळून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्याविरोधात महिलांनी तृणमूलच्या नेत्यांविरोधात बंडाचे निशाण फडकवल्याचेही पाहायला मिळाले. सध्या शाहजहान शेख हे फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
 
या सर्व गोंधळामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे सरकार तसेच त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस अडचणीत आल्याचं दिसतंय. अचानकरित्या शाहजहान खान हे राष्ट्रीय माध्यमांमध्ये कसे झळकत आहेत, हा देखील एक चर्चेचा विषय ठरत आहे. मागच्या दीड महिन्यापासून पोलीस आणि इतर कायदेशीर यंत्रणांच्या हाती न लागलेले शाहजहान शेख नेमके आहेत तरी कोण?
 
शाहजहान यांच्या नावाची चर्चा कधीपासून सुरू झाली?
बंगालच्या कथित रेशन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक 5 जानेवारी रोजी झडतीसाठी पोहोचले तेव्हा शाहजहान शेख यांचं नाव पहिल्यांदा समोर आलं. ही माहिती मिळताच शाहजहान यांच्या शेकडो समर्थकांनी (महिलांसह) ईडी टीम आणि त्यांच्यासोबत असलेल्या केंद्रीय दलासह पत्रकारांना घेराव घातला होता. गावकऱ्यांच्या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले होते. त्यावेळी शाहजहान घरीच होते. मात्र या घटनेनंतर लगेचच ते घरातून पळून गेले. तेव्हापासून आजतागायत त्याचा शोध लागलेला नाही. या घटनेनंतर ईडीने समन्स पाठवले, पण ते कधीच दिसले नाहीत.
 
यावेळी त्यांनी आपल्या वकिलामार्फत कोलकाता उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला. ज्यामध्ये ईडीने त्यांना अटक न करण्याचे आश्वासन दिल्यास ते त्यांच्यासमोर हजर होऊ शकतात असं म्हटलंय. त्यांच्या याचिकेवर सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला गावातील डझनभर महिलांनी रस्त्यावर येऊन शाहजहान आणि त्यांचे दोन कार्यकर्ते शिव प्रसाद उर्फ शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्यावर विविध आरोप करत आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. या महिलांनी पोल्ट्री फार्म आणि तृणमूल नेत्यांच्या घरांनाही आग लावली.
 
या महिलांनी शाहजहान शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात महिलांचा लैंगिक छळ, बलात्कार, जबरदस्तीने जमिनीवर ताबा मिळवणे यांसारखे गंभीर आरोप लावलेत. परिसरातील बिघडलेली परिस्थिती पाहून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि कलम 144 लागू करण्यात आलं आहे. महिलांचा रोष लक्षात घेऊन पोलिसांनी प्रथम उत्तम सरदार आणि नंतर शिबू हाजरा यांना अटक केली. मात्र शाहजहान अजूनही फरार आहे. ते सीमा ओलांडून बांगलादेशात गेला असण्याची शक्यता आहे.
 
मासेमारी करणारा तरुण ते राजकारणी बनण्याचा प्रवास
गेल्या महिन्यापासून चर्चेत असलेले शाहजहान शेख हे मासेमारी करणारे एक तरुण होते. संदेशखालीचे लोक शाहजहानच्या या प्रवासाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या या प्रवासाची कहाणी परिसरातील प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळते. 42 वर्षीय शेख, चार भावंडांमध्ये सर्वांत मोठे आहेत. त्यांच्या वर्चस्वामुळे आणि त्यांना सत्ताधारी पक्षाकडून मिळालेल्या कथित संरक्षणामुळे परिसरात शेख यांना 'भाई' म्हणून ओळखलं जातं. शेख यांनी वीटभट्टीवरही काम केलंय. वीटभट्टीवर काम करत असताना 2004 मध्ये ते युनियन लीडर बनले.
 
स्थानिक लोकांचा दावा आहे की, 2000 पर्यंत त्यांनी कधी बस कंडक्टर म्हणून काम केलं तर कधी घरोघरी जाऊन भाजीपाला विकला आहे. संदेशखाली परिसरात शाहजहान जेव्हा राजकारणाची सुरुवात करत होते, तेव्हा पश्चिम बंगालमध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचं सरकार होतं. आपल्या सोयीसाठी ते दोन वर्षांनी म्हणजे 2006 मध्ये सीपीएममध्ये सामील झाले.
 
2011 मध्ये डाव्या आघाडीची सत्ता संपुष्टात आल्यानंतर त्यांनी पुढच्याच वर्षी टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल रॉय आणि उत्तर 24-परगणा जिल्हा पक्षाचे अध्यक्ष ज्योतिप्रिया मल्लिक यांच्यामार्फत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. गेल्या पंचायत निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळवल्यानंतर पक्षाने त्याला जिल्हा परिषद सदस्य केलं.
 
विश्लेषकांच्या मते, सीपीएमची सत्ता जात असल्याचं लक्षात घेऊन शाहजहानने 2008-09 पासून त्यांच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. संदेशखाली येथील रहिवासी बिजन कुमार (नाव बदललेलं आहे) सांगतात की, शाहजहान राजकारण आणि सत्तेचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय हे समजण्यात पटाईत आहे.
 
परिसरात वर्चस्व आणि तृणमूलचं संरक्षण
संदेशखाली परिसरातील एका सीपीएम नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "शाहजहान यांची वृत्ती पक्षात असेपर्यंत चांगली होती. मात्र तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून जिल्ह्यातील नेत्यांचा वरदहस्त लाभल्यावर त्यांनी उघडपणे दादागिरी करायला सुरुवात केली."
 
या भागातील निवडणूक समीकरण लक्षात घेऊन वरिष्ठ नेत्यांनी देखील त्याला यासाठी परवानगी दिली होती.
या भागात शाहजहान यांची इतकी दहशत होती की त्यांच्याविरुद्ध तोंड उघडण्याची कोणाचीही हिंमत नव्हती.
लवकरच शाहजहान यांची संदेशखाली ब्लॉक नंबर 1 चा तृणमूल प्रमुख आणि नंतर आगापूर सरबेडिया ग्रामपंचायतीचे प्रमुख बनले. 2023 च्या पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर, ते उत्तर 24-परगणा जिल्हा परिषदेचे सदस्य आणि मत्स्यव्यवसाय, प्राणी संसाधन विभागाचे प्रमुख बनले.
 
ईडी ज्या प्रकरणात शाहजहान शेख यांचा शोध घेत आहे त्याच रेशन घोटाळ्यात माजी अन्न मंत्री ज्योतिप्रिया मल्लिकही तुरुंगात आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून शेख फरार आहेत. शाहजहान शेख मल्लिकच्या अगदी जवळचे मानले जायचे. यामुळेच त्यांच्या घरी पोहोचलेल्या ईडीच्या टीमवर स्थानिक लोकांनी हल्ला केला. स्थानिक लोकांचा दावा आहे की, शाहजहान यांची भीती दाखवून त्यांचे दोन कार्यकर्ते शिवप्रसाद उर्फ शिबू हाजरा आणि उत्तम सरदार हे गावकऱ्यांवर अत्याचार करायचे.

भाजपचा दावा
भाजप नेत्यांनी असा दावा केलाय की, तीन वर्षांपूर्वी संदेशखालीच्या भांगीपाडा भागात टीएमसी आणि भाजपमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातही शाहजहान यांचं नाव पुढे आलं होतं. मात्र सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणामुळे त्यांना कोणीच काही केलं नाही. 2023 च्या पंचायत निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे 17 वाहने आणि 14 एकर जमीन असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. या सगळ्याची एकूण किंमत 4 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं.
 
याशिवाय त्यांच्याकडे बँकेत अडीच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1.92 कोटी रुपयांची रोकड होती. त्यांनी वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपये दाखवलं होतं. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. या कारवायांमुळे तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनीही त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी म्हटलंय की, "शाहजहान यांच्याकडे शेकडो मत्स्यपालन केंद्रे आणि वीटभट्ट्या आहेत. याव्यतिरिक्त एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कोलकाता पार्क सर्कसमध्ये कोट्यवधींचं घर आहे."
 
भाजपने आरोप केलाय की, शाहजहानला आधी सीपीएमने संरक्षण दिलं होतं आणि नंतर तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत त्यांची भरभराट झाली. पण डाव्या आघाडीच्या सरकारच्या काळात शाहजहान हा एक साधा कार्यकर्ता होता, असा सीपीएमचा दावा आहे. राज्य सचिव मोहम्मद सलीम म्हणतात, "तुम्ही त्यावेळी शाहजहानचं नाव कुठेही ऐकलं नसेल. ते तृणमूल काँग्रेस सरकारच्या संरक्षणात मोठे झालेत आणि आज या पदावर पोहोचले आहेत."
 
राजकारणात अपवाद नाही
मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अद्याप शाहजहान शेख प्रकरणावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. हे प्रकरण तापल्यानंतर त्यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, "संदेशखाली परिसर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथे गडबड असते. मात्र, पोलीस कारवाई करत आहेत. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक केली जाईल."
 
सध्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहानच्या प्रकरणावर काहीही बोलण्यास कचरत आहेत. आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, "पोलीस सर्व आरोपांची चौकशी करत आहेत. या प्रकरणातील दोषींना मोकळं सोडलं जाणार नाही. संदेशखालीचे दोन नेते शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे."
 
संदेशखालीला भेट देणारे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी पत्रकारांना सांगितलं की, "सर्व आरोपांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही." शाहजहान शेखसारखे नेते राजकारणात एखाद-दोनच आहेत असं नाही, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
सत्तेत बदल घडत राहतो पण शाहजहान शेख सारखे लोक या व्यवस्थेत कायम असतात. राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुकुमार सेन म्हणतात, "शाहजहान शेख सारख्या नेत्याची राजकीय पक्षांना गरज असते. असे लोक संबंधित पक्षाचे राजकीय हित साधतात आणि त्या बदल्यात राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या चुकीच्या कामाकडे डोळेझाक करतात."
 
Published By- Dhanashri Naik