आसारामच्या सुनेची छळाची तक्रार
इंदूर- बलात्काराच्या आरोपांखाली कारागृहात असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसारामबापू याच्याविरोधात आता त्याच्या सुनेनेच छळवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत आसारामचा मुलगा नारायणसाई याचेही नाव घेण्यात आले आहे.
नारायणसाई याची पत्नी जानकी (वय 38) हिने या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच तिने पोलिसांकडे आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
जानकीला दूरध्वनीवरून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. नारायणसाई हा सध्या सूरतमधील कारागृहात आहे, तर आसारामबापू जोधपूरमधील कारागृहात आहे. लग्नानंतरही नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते, असे जानकीने तक्रारीत म्हटले आहे. त्याचसोबत दोघा पिता-पुत्रांनी अनेक शिष्यांची संपत्तीही हडप केल्याचे तिने म्हटले आहे.
