1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. बिहारमध्ये एनडीएचे मेतकूट जमले

बिहारमध्ये एनडीएचे मेतकूट जमले

bihar vidhansabha election 2015
बर्‍याच दिवसापासून सहकारी पक्षांच्या नाकदुर्‍या काढणार्‍या भाजपने अखेर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी त्रिकुटाशी मेतकूट जमवले. बिहारमध्ये भाजप 160 जागा लढवणार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांना 83 जागा देण्यात आल्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली.
 
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पक्षाला 40 जागा देण्यात आल्यात, तर जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा 20, तर राष्ट्रीय लोकसमता पार्टी 23 जागा लढवणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.
 
लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या नरेंद्र मोदी लाटेचा धसका घेऊन बिहारमध्ये लालू-नितीश-काँग्रेस यांनी गळ्यात गळे घातले. त्यांचे गूळपीट इतके जमले की, त्यांच्यात जागावाटपावरून अजिबातच वाद दिसत नाही. पण दुसरीकडे, एनडीएतील सहकारी पक्ष भाजपवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात होते. 
 
 
अमित शहा म्हणाले..
* बिहारमध्ये ‘जंगलराज’ हा शब्द पंतप्रधानांनी लालूप्रसाद यादव यांच्या कार्याकाळासाठी वापरला होता.
 
* बिहार निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएसाठी स्टार प्रचारक असतील.
 
* एनडीएकडून भाजप 160, एलजेपी 40, एचएएम 20, आरएलएसपी 23 जागांवर निवडणूक लढविणार.
 
* बिहारमध्ये एनडीएला दोनतृतीयांश बहुमत मिळेल.
 
* बिहार निवडणूक; महाआघाडीमध्ये ऐक्य नाही, अमित शहा यांचा टोला.