मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (09:27 IST)

अमन सहरावत : 11 व्या वर्षी आई-वडिलांचं छत्र हरपलं, संघर्षावर मात करत 21 व्या वर्षी 'ऑलिंपिंकवीर' ठरला

पॅरिस ॲालिंपिकमध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सहरावतने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे.
 
अमनच्या या पदकामुळे आता भारताची पदकसंख्या सहावर जाऊन पोहोचली आहे.
 
अमन या ऑलिंपिकमध्ये खेळणारा भारताचा एकमेव पुरुष पैलवान आहे.
 
अमननं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण त्याचा पराभव झाला होता. त्यानंतर त्याला रिपेचाजमध्ये कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळाली.
 
9 ॲागस्टला झालेल्या सामन्यात अमननं प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूझवर गुणांच्या आधारे 13-5 अशी मात केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट लिहून अमन सहरावतचं अभिनंदन केलं आहे.
 
नरेंद्र मोदींनी लिहिलं की, "आमच्या कुस्तीपटुंचा आम्हाला अभिमान आहे. पॅरिस ॲालिंपिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलेल्या अमन सहरावतचं अभिनंदन. त्याचा दृढनिश्चय आणि कष्ट स्पष्टपणे दिसून आलं.संपूर्ण देश या उल्लेखनीय कामगिरीचा आनंद साजरा करत आहे."
 
काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अमन सहरावतचं अभिनंदन करताना एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर असं लिहिलं की, "फ्रीस्टाइल कुस्तीत कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सहरावतचं खूप खूप अभिनंदन. पॅरिस ॲालिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना मिळालेलं सहावं पदक बघून आनंद झाला. ॲालिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूचा संपूर्ण देशाला अभिमान आहे."
 
यापूर्वी गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात अमन सहरावतला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात जपानच्या के रेई हिगुचीने अमनचा पराभव केला होता.
 
21 वर्षीय अमनचा पॅरिस ॲालिंपिकमधला प्रवास
सुवर्णपदक विजेत्या जपानच्या मल्लविरुद्ध अमनचा 10-0 असा पराभव झाला होता. त्याआधी झालेल्या उपउपांत्य फेरीत अमनने अल्बानियाच्या अबकरोव्हचा 12-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती.
 
अमनने त्याच्या पहिल्या फेरीत माजी युरोपियन चॅम्पियन असलेल्या व्लादिमिर एगोरोव्हचा 10-0 असा दणदणीत पराभव केला होता. या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना एकही पदक मिळालं नव्हतं. त्यामुळे यंदा भारतीय कुस्तीपटू रिकाम्या हाताने भारतात परत येण्याची भीती कुस्तीप्रेमींना सतावत होती पण अमनने तसं होऊ दिलं नाही.
 
महिलांच्या कुस्तीमध्ये भारताला विनेश फोगाटकडून पदकाची अपेक्षा होती. विनेशने उपांत्य फेरीत सफाईदार विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेशही केला होता पण अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आणि संपूर्ण देशात निराशा पसरली.
 
पहिल्या सामन्यात व्लादिमिर एगोरोव्हला हरवल्यानंतर उपउपांत्य फेरीत अमनसमोर अल्बानियाच्या अबकरोव्हचं कठीण आव्हान होतं. अबकरोव्ह हा 2022मध्ये वर्ल्ड चॅम्पियन राहिला होता, त्यामुळे या सामन्यात काय होईल? अशी चिंता अनेकांना सतावत होती. पण अखेर तांत्रिक गुणांच्या (टेक्निकल सुपेरियॉरिटी)च्या बळावर अमनने अबकरोव्हचा 12-0 असा पराभव केला.
 
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारला तुरुंगवास ठोठावला होता त्याकाळात अमनने कुस्तीत स्वतःची ओळख बनवली होती. त्याच्यासाठी तो प्रवास अजिबात सोपा नव्हता कारण त्यावेळी भारतीय कुस्तीविश्वात अनेक वाद निर्माण झाले होते. मागच्या वर्षी झालेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे देशातील कुस्ती जवळपास ठप्प पडली होती. त्यात भरीस भर म्हणून टोक्यो ॲालिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारा रवी दहियाला गंभीर दुखापत झाली होती.
 
अशा बिकट परिस्थितीत 21वर्षांचा अमन सहरावतने भारतीय कुस्तीप्रेमींच्या अपेक्षांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. यंदा अमन सहरावत हा भारताचा एकमेव पुरुष कुस्तीपटू आहे जो या स्पर्धेत सहभागी होऊ शकला.
 
ॲालिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी अमन हा सगळ्यात कमी वयाचा खेळाडू आहे.
 
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममधून झाली होती सुरुवात
हरियाणातील झज्जरच्या बिरोहर गावात राहणारा अमन सहरावत हा दिल्लीतील प्रसिद्ध छत्रसाल स्टेडियममध्ये तयार झालेला जागतिक दर्जाचा कुस्तीपटू आहे. हा तोच कुस्तीचा आखाडा आहे ज्या आखाड्यातून आजवर सुशील कुमार, रवी दहिया, बजरंग पुनिया सारखे ॲालिंपिक पदक विजेते खेळाडू तयार झाले. या नावांसोबतच छत्रसाल स्टेडियमने भारतीय कुस्तीविश्वाला अनेक गुणवंत मल्ल दिले आहेत.
 
अमनचा जन्म 2003 मध्ये झाला. तो 11 वर्षांचा असताना त्याचे आई-वडील वारले आणि त्यानंतर अमनच्या आजोबांनी त्याचा सांभाळ केला. आई वडिलांना गमावण्याच्या दुःखातून सावरण्यामध्ये अमनच्या आजोबांची भूमिका मोठी आहे.
 
अतिशय कमी वयात कुस्तीत गती दाखवल्यामुळे अमनला छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीचे डावपेच शिकण्यासाठी पाठवण्यात आलं.
 
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार यांच्यावरून प्रेरित होऊन अमनने कुस्तीची निवड केली. सुशील कुमार यांना 2008 च्या बीजिंग ॲालिंपिकमध्ये कांस्य तर 2012च्या लंडन ॲालिंपिकमध्ये रौप्यपदक मिळालं होतं.
 
नूर-सुलतान येथे 2019 आशियाई कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकून अमनने पहिल्यांदाच त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली होती. तीन वर्षांनंतर 2022 मध्ये, 23 वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारा अमन पहिला भारतीय ठरला होता.
 
2023 मध्येही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि त्याने अस्ताना येथील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
 
जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत, पॅरिस 2024 ॲालिंपिकमध्ये प्रवेश मिळवणारा अमन हा भारताचा एकमेव पुरुष खेळाडू ठरला. शेवटी टोक्यो ॲालिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारा रवी दहियाच्या जागी अमन या स्पर्धेत सहभागी झाला.