ऑस्कर मिळवायचाय? गरीबी दाखवा !
ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल दिग्दर्शित 'स्लमडॉग मिलिनयर' या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. पण ऑस्कर मिळाल्यानंतर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे 'भारताची गरीबी परदेशात विकण्याची'. भारतातील गरीबीचे चित्रण करणार्या सिनेमांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक मिळते असे आतापर्यंतचे मत होते. पण त्याचबरोबरीने ही गरीबी भारतीय दिग्दर्शकाने दाखवली तर तला कौतुकाखेरीज पुरस्कार वगैरे मिळत नव्हते. कारण इतिहास तेच सांगतो. मदर इंडिया, सलाम बॉम्बे हे चित्रपट भारतीय गरीबीवरच आधारले आहेत. लगान क्रिकेटवर आधारीत असला तरी त्याच्या मुळाशी गरीबीच होती. पण त्यांना ऑस्कर मिळाले नाही. इतकेच काय पण दीपा मेहता यांनी कॅनडातर्फे 'वॉटर' हा वृंदावनमधील विधवांचे दुःखद चित्रण असलेला चित्रपट ऑस्करसाठी पाठवला होता. पण ऑस्करमध्ये तोही डावलला गेला. इतकेच काय पण सत्यजित राय या प्रतिभावंत दिग्दर्शकाने गरीबीचे अत्यंत वेधक चित्रण करूनही त्यांना चित्रपटांसाठी कधीच ऑस्कर मिळाला नाही. मिळाला तो लाईफटाईम अचिव्हमेंट या स्वरूपात. म्हणजे लाईफटाईम अचिव्हमेंट ज्या चित्रपटांसाठी वाटते, ते ऑस्करलायक नाहीत काय? पण आता स्लमडॉगला मात्र ऑस्कर मिळाले आहे. मग स्लमडॉगच्या तुलनेत मीरा नायरच्या 'सलाम बॉम्बे'मध्ये काय कमी होते. मग त्याला का ऑस्कर मिळाले नाही. ती भारतीय आहे म्हणून? तीच कथा ' स्माईल पिंकी' या शॉर्ट डॉक्युमेंटरीची. ही पिंकी उत्तर प्रदेशातील मिर्झापुरची आहे. ओठ फाटलेल्या पिंकीचा संघर्ष या चित्रपटात वर्णन केला आहे. थोडक्यात गरीबी आणि संघर्ष हे तिच्या आयुष्यातील प्रमुख घटक आहे. या विषयावर अनेक भारतीयांनी डॉक्युमेंटरी काढल्या आहेत. पण मेगन मेलॅन या परकीय बाईने ही डॉक्युमेंटरी केली काय नि तिच्या झोळीत ऑस्कर जाऊन पडला आहे. थोडक्या ऑस्कर मिळविण्याचा महत्त्वाचा निकष म्हणजे चित्रपटात, दुःख, दैन्य, गरीबी हवीच. पण ती परकीयांनी दाखवलेली. भारतीयांनी नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली नोंदवायला विसरू नका.