शिकण्यासाठी परदेशी वास्तव्य करताना  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  गेल्या काही वर्षांपासून तरूण-तरूणींमध्ये परदेशी शिक्षणाविषयी ओढा वाढत चालला आहे. त्याचवेळी परदेशातीलही अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत आहेत. 
				  													
						
																							
									  
	 
	जागतिकीकरणामुळे या गोष्टी अधिक सुलभ झाल्या आहेत. अलीकडे परदेशी शिक्षणाची दारं मोठ्या प्रमाणावर खुली झाली आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक भारतीय तरूण-तरूणी परदेशात जात आहेत. शिक्षणानंतर कारकिर्दीसाठी परदेशात स्थायिक होणारेही अनेकजण आहेत. परदेशातील वास्तव्यात काही वेळा वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. हवामान, भाषा, संस्कृती, खानपान हे सगळंच बदलतं. या सगळ्याशी जुळवून घेणं कठीण असतं. त्यासाठी परदेशी शिक्षणासाठी जाणार्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
				  				  
	 
	* त्या देशातल्या संस्कृतीबद्दल जाणून घ्या. त्या देशाचा इतिहास जाणून घेण्यात रस दाखवा. त्या संदर्भात प्रश्न विचारत राहा. त्यात भाषेची अडचण येत असेल तर ती सोडवण्याचा प्रयत्न करा.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	* परदेशात गेल्यावर भरपूर फिरा. फिरल्याने खूप गोष्टी समजतात. फिरायची संधी साधा. त्या देशातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी द्या. यामुळे त्या देशाच्या इतिहासाची, भूगोलाची माहिती होईल.
				  																								
											
									  
	 
	* तुमचे विचार मोकळे ठेवा. सकारात्मक विचार करा. संस्कृतींमधला फरक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. नव्या लोकांशी बोला.
				  																	
									  
	 
	लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा. आपण वेगळे आहोत किंवा उपरे आहोत ही भावना मनात येऊ देऊ नका.
				  																	
									  
	 
	* त्या त्या ठिकाणची शक्य तेवढी माहिती करून घ्या. मुख्यत्वे कोणाच्या सांगण्यावरून काही समज बाळगू नका. लोकांबद्दल, तिथल्या वातावरणाबद्दल प्रत्यक्ष अनुभव घेणं केव्हाही हिताचं ठरतं. अशा अनुभवांमधून काही गोष्टी शिकून घ्या.
				  																	
									  
	 
	*तिथं राहतानाही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या उपक्रमात स्वतःला जोडून घ्या. छंद वर्ग लावा. परदेशांमध्ये मराठी मंडळं तसंच भारतीयांच्या संस्था असतात. त्यांचे सदस्यही होता येईल.
				  																	
									  
	 
	* तुमच्यासारखे इतर परदेशी विद्यार्थी आले असतील. त्यांच्याशीही बोलता येईल. ओळखी वाढवता येतील. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करता येईल. यामुळे तुमच्या कक्षा रूंदावण्यास मदत होईल.
				  																	
									  
	 
	* महत्त्वाची बाब म्हणजे परदेशात असताना भारतातील नातेवाइकांच्या संपर्कात राहा. व्हिडिओ चॅट करा. त्यांना तुमच्या अडचणी सांगा आणि त्या संदर्भात त्यांचा पाठिंबा मिळवणंही महत्त्वाचं ठरेल.