'टाईम मॅनेजमेंट' महत्त्वाचं!
दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येवून ठेवल्याहेत. विद्यार्थीच नाही तर शिक्षक व पालकही तयारी लागले आहेत. चांगल्या भविष्यासाठी, मिरिट लिस्टमध्ये झळकून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी चांगले मार्कस् मिळविण्यासाठी रात्रंदिवस 'अभ्यास एके अभ्यास' करीत आहेत.दहावीची परीक्षा म्हणजे, करीयरची पहिली पायरी. दहवीच्या निकालावरच आपल्या करीयरची दिशा ठरत असते. त्यामुळे दहावीचे वर्ष, हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष समजले जात असते. यासाठी आपल्याकडे 'टाईम मॅनेजमेंट' अर्थात वेळेचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यावर अनावश्यक कामांचा व्याप व अपेक्षांचे ओझे टाकू नये. विद्यार्थी हे आपापल्या परीने परीक्षेची तयारी करीत असतात. उलट पालकांनी आपल्या पाल्याच्या मनातील भिती काढून टाकावी, विद्यार्थ्यांसाठी पालकांचा हा आधार खूप फायदेशिर ठरत असतो. विद्यार्थ्यांनी मनात कोणत्याच प्रकारची भिती न ठेवता शांत चित्ताने परीक्षा दिली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन केले पाहिजे. जे काही दिवस शिल्लक असतील. त्यात नियोजनबध्द रित्या अभ्यास केला पाहिजे. काही विद्यार्थी रात्र- रात्र जागून अभ्यासाचा रट्टा मारत बसतात. मात्र ऐनवेळी त्यातील काहीच आठवत नाही व तब्बेत बिघडते. अभ्यासासोबत आपल्या प्रकृतीकडे ही लक्ष दिले पाहिजे. '
वेळ' ही आपल्यासाठी थांबून रहात नाही. त्यासाठी 'टाईम मॅनेजमेंट' खूप आवश्यक आहे. मुलांनी 'सेल्फ स्टडी'वर भर दिला पाहिजे. ट्यूशन लावण्याची काही आवश्यकता नाही. काही अडचण आल्यास वर्गशिक्षकांना ती सोडवून घ्यावी. गेल्या दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून चांगला सराव करावा. निम्यापेक्षा जास्त प्रश्न त्यातूनच येत असतात. असा यशस्वी विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. परीक्षेला जाताना आधी मनातील भिती काढून टाकावी. प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर ती डोके ठिकाणावर ठेऊन शांत चित्ताने वाचून घ्यावी. जे-जे प्रश्न तुम्ही चांगल्याप्रकारे सोडवू शकतात. अशा प्रश्नांचा क्रम मनात तयार करून ठेवावा. अथवा पेन्सिलीने त्यावर मार्क करून घ्यावे. पेपर सोडविताना ही 'टाईम मॅनेजमेंट'चे भान ठेवले पाहिजे. आधी येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या शब्दमर्यादेत लिहिली पाहिजेत. उत्तरे लिहित असतांना महत्त्वाच्या गोष्टी नमुद केल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. बेस्ट लक..!