1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मार्च 2025 (10:51 IST)

पुण्यात पगार कपात वरून नाराज चालकाने स्वतः पेटवली बस, चार जणांचा मृत्यू

bus fire
पुण्यातील हिंजवडी परिसरात गुरुवारी एका मिनीबसला आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. पोलिसांच्या मते, हा अपघात नव्हता तर बस चालक जनार्दन हंबर्डीकरचा सुनियोजित कट होता. पोलिस तपासात हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
बस चालकाने स्वतः बसला पेटवले आणि अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. चालकाचा त्याच्या सहकाऱ्याशी झालेल्या वादामुळे त्याने बस पेटवण्याचा कट रचला.बस चालकाचे कंपनीशी असलेल्या जुन्या वैमनस्यातून आणि नाराजीतून ही घटना घडली. कर्मचाऱ्यांशी झालेला वाद आणि पगारात कपात केल्यामुळे चालक नाराज होता. त्यामुळे त्याने हे कृत्य केले. 
आरोपी चालकाने मंगळवारी त्याच्या कंपनीतून रसायन आणले आणि काही कपडे बस मध्ये ठेवले. बुधवारी सकाळी वारजे परिसरातून त्याने काडेपेटी विकत घेतली. 
 
बस हिंजवडी फेज वन परिसरात पोहोचताच त्याने तिथे आधीच ठेवलेले कपडे पेटवून दिले. रसायनांमुळे आग वेगाने पसरली. आग लागल्यानंतर, चालकाने ताबडतोब बसमधून उडी मारली, तर बसमधील इतर लोक आगीत अडकले. आगीत बस चालकालाही किरकोळ दुखापत झाली. पण त्याने पोलिसांसमोर बेशुद्ध असल्याचे नाटक केले. चौकशीदरम्यान अस्पष्ट उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कडक चौकशी केली आणि त्याचा कट उघडकीस आला.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बस चालकाने जाणूनबुजून गाडी पेटवली आणि अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103 आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.आगीत चार जण मृत्युमुखी झाले. 
 
Edited By - Priya Dixit