सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (08:13 IST)

गावठी पिस्तूल बाळगणारा ‘मायाभाई’ ला पकडले

पुण्याजवळ असलेल्या सासवड  पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेजुरी नाका येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून शिताफीने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दुचाकी, असा एकूण 85 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव गौरव उर्फ मायाभाई बाळासो. कामथे (वय 22, रा. खळद गाव, ता. पुरंदर, जि. पुणे), असे  आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी जेजुरी नाका येथे एकजण काळ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवर गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पथकाला मिळाली.
 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी जेजुरी नाका परिसरात सापळा लावून एकाला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याजवळ लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मोपेड दुचाकी, असा एकूण 85  हजारांचा मुद्देमाल जप्त केला.  पुढील तपासासाठी त्याला सासवड पोलिसांच्या हवाली करण्यात आले.