बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (16:32 IST)

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात दहशत माजवण्यासाठी टोळक्याने चांगलाच राडा घातला

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात दहशत माजवण्यासाठी टोळक्याने चांगलाच राडा घातला असून मध्यरात्री या टोळक्याने आंबेडकर नगर येथील तब्बल 40 ते 50 वाहनांची तोडफोड केली. पोलीस 7 जणांचे नावे सांगत असले तरी स्थानिकांनी मात्र 15 ते 20 जणांचे टोळकं आले होते, असे सांगितले आहे. यामुळे व्यापारी वर्ग आणि वसाहतीत चांगलीच दहशत पसरली आहे.
 
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 4 जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात आंबेडकरनगर वसाहत आहे. या भागात कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. कष्टकऱ्यांची प्रवासी रिक्षा, टेम्पो रिक्षा, दुचाकी, हातगाडी यासारखी अनेक वाहने रस्त्यावर पार्क केलेली असतात. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन या परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. मोठमोठ्या आरडाओरडा करत हे टोळके सुटले आणि त्यांनी समोर दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी एकजण मध्ये आला असता त्याला देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तोडफोड तर केलीच पण वाहनांच्या सीट देखील फाडल्या. तब्बल तासभर या टोळक्याचा धुडगूस सुरू होता. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्केटयार्ड पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड झालेल्या वाहनांची पाहणी केली. त्यानंतर टोळक्याच्या विरोधात मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व प्रकारानंतर स्थानिक नागरिक मात्र चांगलेच संतप्त झाले.