लघुशंकेला जाणं पडलं महागात, 97 लाख रुपये लंपास
पुणे- पुण्यातील हडपसर परिसरात एका विचित्र घटनेत एका व्यावसायिकाला वाहन चालकाने 97 लाखांचा गंडा घातला. व्यवसायी लंघूशकेसाठी उतरला आणि चालक गाडीत ठेवलेले 97 लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. विजय हुलगुंडे असं फरार आरोपी चालकाचं नाव आहे.
50 वर्षीय ड्रायफ्रूट्स व्यावसायिकानं हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आरोपी विजय हुलगुंडे कोंढवा परिसरातील रहिवासी असून मागील आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता.
दरम्यान आरोपीनं फिर्यादीचा विश्वास संपादन देखील केला होता परंतु सोमवारी त्याने मालकाला 97 लाख रुपयांचा गंडा घातला.
व्यावसायिक सोमवारी व्यावसायिक रक्कम घेऊन कोंढव्यातून हडपसरकडे येत होते. दरम्यान त्यांना लघुशंका आल्याने त्यांनी कल्याणीनगर परिसरात गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी रस्त्याच्या कडेला लावण्यात आली आणि फिर्यादी लघवी करण्यासाठी गाडीतून बाहेर पडले. दरम्यान पैशांनी भरलेली बॅग गाडीतच ठेवली होती. ही संधी साधत आरोपी चालकानं काही अंतर गाडी पुढे नेऊन उभी केली. आणि पैशाची बॅग घेऊन पळ काढला.
व्यावसायिक लघवी करून परत येईपर्यंत चालक आणि पैसे दोन्ही गायब होते. याप्रकरणी फिर्यादीनं हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.