1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:37 IST)

मी कोविड लस घेतली – आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना कोरोनाचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पहिली लस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली. तर दुसरी लस अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घेतली.
 
पोलीसांनी माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात ३ हजार १०० पेक्षा अधिक पोलीस कार्यरत आहेत. त्या सर्वांचे लसीकरण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये करून घेतले जाणार आहे. चिंचवड येथील आयुक्तालय कार्यालयात जम्बो लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून शहर पोलीस दलातील सर्व पोलिसांना लस दिली जाणार आहे. सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. नियोजनाप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्याचे पोलीस चिंचवड येथे येतील आणि लस घेतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
 
कोरोना काळात शहरात फक्त पोलीस, वैद्यकीय सेवा यांचाच राबता होता. कोरोना काळात फ्रंट लाईनवर काम करत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला. जानेवारीच्या सुरुवातीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आता पोलिसांना देखील लस दिली जात आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रथम लस घेतली. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी लस घेतली. शहर पोलीस दलातील १५ स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा यांसह विविध शाखा आणि विभागात कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे.