पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन सभा
भारतीय समाज दुहेरी व्यवस्थेत जगतो. दैनंदिन व सामाजिक जीवनात तो चातुर्वर्ण्यावर आधारित मनूची व्यवस्था जगत असतो. तर कायदेकानू, नियम यासाठी संविधानावर आधारलेली व्यवस्था त्याला लागू होते. मात्र मनुवादी व्यवस्था आणि संविधान हे एकाच वेळी एकत्र वाटचाल करू शकत नाहीत. मनुवादी विषमतेवर आधारीत व्यवस्था संपवण्यासाठी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला आहे. मात्र संविधान केवळ पुस्तकातच रहात आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये संविधानाची मूल्य उतरली पाहिजेत. मनुवादी व्यवस्था बदलण्यासाठी टीका केलीच पाहिजे, मात्र त्याचबरोबर आपणही आपल्या जगण्यात सत्यशोधनाचा विचार स्वीकारला पाहिजे असे प्रतिपादन कष्टकऱ्यांचे नेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
बाबा आढाव म्हणाले की, संविधानाने स्विकारलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा इ. मूल्यांचे चिंतन व प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र इथली प्रस्थापित व्यवस्था ते होऊ देत नाही. आकाशवाणीवर पहाटे ऐकवलं जाणार चिंतन हे त्याचं ठळक उदाहरण आहे. या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये सांगितले गेलेल्या मूल्यांचा प्रसार झाला पाहिजे.
सभागृहात मोठ्या संख्येने आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींचया उपस्थितीकडे लक्ष वेधून डॉ. आढाव म्हणाले, या उपस्थितीवरून न्यायमूर्ती सावंत हे सर्व घटकांना किती आधार वाटत होते आणि आपापसात मतांतरे असतानाही त्यांचा शब्द अंतिम वाटत होता हे स्पष्ट होत आहे.