महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार
पुणे : राज्यात थंडी वाढली असतानाच किमान तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आता थंडीचा प्रभाव जोर धरणार आहे. दरम्यान मंगळवारी औरंगाबाद येथे सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
उत्तरेकडील राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेशच्या भागात थंडीची लाट पसरली आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या काही भागात बर्फवृष्टी होत आहे. तसेच या भागात मोठय़ा प्रमाणात धुके पसरले आहे. पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा आधीच घसरला आहे. नवीन वर्षाची सुरुवात थंडीनेच झाली आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांत वाढ होणार असल्याने पुढील तीन ते चार दिवसांनंतर मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत मंगळवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
कुलाबा 18.8, सांताक्रूझ 15.8, रत्नागिरी 17.8, डहाणू 15.4,पुणे 10.9, लोहगाव 14.3, जळगाव 10, कोल्हापूर 18, महाबळेश्वर 14.2, नाशिक 10.2, सांगली 16.9,सातारा 14.5,सोलापूर 18.8,परभणी 14.6,नांदेड 16.8, अकोला 14.4, अमरावती 14.9, बुलढाणा 13.2, ब्रह्मपुरी 14.5, चंदपूर 16.3, गोंदिया 11.6, नागपूर 13.6, वाशिम 14.8, वर्धा 13.8, यवतमाळ 15.5, पणजी 20.
Edited By- Ratnadeep Ranshoor