सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (09:07 IST)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा 12 जुलैपासून

Savitribai Phule Pune University's second session examination from 12th July
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांना 12 जुलैपासून सुरुवात होत असून या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारण 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.बहुपर्यायी पध्दतीने ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका,पदवी,पदव्युत्तर पदवी,प्रमाणपत्र व इतर अशा एकूण 284  अभ्यासक्रमांसाठी 4 हजार 195 विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.मुख्य परिक्षेआधी याही सत्रात 8 ते10 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षेत विदयार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येतील.
 
मुख्य परीक्षा 12 जुलैपासून सुरू होणार असून परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेण्यात येणार असून 60 प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. यातील 50  प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
 
विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण 30 प्रश्न विचारले जाणार असून त्यातील 25 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.
 
ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करू नये यासाठी या सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्वावर नमुना दाखल काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येईल, यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल. डॉ. महेश काकडे, संचालक :परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
 
‘या’  विषयांबाबत तक्रार दाखल करता येणार
 
लॉग इन न होणे,लॉग आउट होणे,इंग्रजी/ मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे,आकृत्या न दिसणे,पेपर सबमिट न होणे,विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोविड विषाणू बाधा झालेली असणे,विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए,सीईटी तत्सम परीक्षा एकाच दिवशी येणे.अशी कारणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करता येईल, मात्र प्रत्येक तक्रारीची छाननी होईल.तसेच अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचे हॉल तिकीट किंवा तत्सम पुरावा देणे गरजेचे असेल.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही अर्ज भरता आले नाही अशा विद्यार्थ्यांना 12, 13 व 14 जुलै रोजी परीक्षा अर्ज भरता येतील.त्यांची परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येईल अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी दिली.
 
प्रथम सत्र परीक्षेची ठळक आकडेवारी
 
एकूण अभ्यासक्रम – 284
 
एकूण परीक्षार्थीं – 5,79,928
 
सिद्ध झालेल्या कॉपी केसेस-350
 
पुनर्परिक्षेसाठी अर्ज- 29710
 
तपासणीअंती झालेल्या पुनर्परिक्षा- 14,314