मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (08:24 IST)

ऑलिम्पिक कोटा’ मिळविणाऱ्या कुस्तीगिरांनाही चाचणी अनिवार्य!

wrestlers
पुणे :जागतिक संघटनेकडून बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी समितीने आश्चर्यकारक निर्णय घेण्याची प्रथा कायम ठेवली आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवणाऱ्या कुस्तीगिरांनाही या स्पर्धेसाठी भारताच्या संघात थेट स्थान मिळणार नाही. त्यांनाही पात्रता सिद्ध करण्यासाठी निवड चाचणीत खेळणे अनिवार्य करण्याचा निर्णय हंगामी समितीकडून घेण्यात आला आहे.

हंगामी समिती सुरुवातीला आव्हानवीरांची निवड करणार आहे. समितीने निश्चित केलेल्या आव्हानवीरांशी देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिलेले मल्ल 1 जून 2024 रोजी खेळतील आणि या लढतीतील विजेता मल्ल ऑलिम्पिकसाठी जाईल. आतापर्यंत देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून देणारा मल्लच ऑलिम्पिकमध्ये खेळला आहे. हंगामी समिती आता वेगळय़ा हुकूमशाहीने वागत असल्याची चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत भारताला केवळ महिला कुस्तीगीर अंतिम पंघालने (53 किलो) ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे. अजून 17 मल्लांना पात्रता सिद्ध करायची आहे.

त्यांना आशियाई ऑलिम्पिक पात्रता19 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत किर्गिस्तान, तर जागतिक ऑलिम्पिक पात्रता 9ते 12 मे 2024 या कालावधीत तुर्की येथे होणाऱ्या स्पर्धेत ही संधी मिळणार आहे.या पात्रता फेरी झाल्यानंतर देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिलेल्या मल्लांचे आव्हानवीर हंगामी समिती 31 मे रोजी जाहीर करेल आणि मग त्यांच्यात 1 जूनला लढत होईल.

Edited By - Ratnadeep Ranshoor