पुण्यात पावसाने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
असा आरोप आहे की, कंत्राटदाराने सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी खोदलेले खड्डे बॅरिकेड्स किंवा सूचना फलक न लावता उघडेच ठेवले होते. त्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सदर घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडलाय येथे सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी चार मोठे खड्डे खणले होते. नंतर हे काम अपूर्ण सोडले आणि खड्ड्याच्या आजू-बाजूला कोणतीही सुरक्षा उपाय योजना केली नव्हती. पावसामुळे हे खड्डे पाण्याने तुंबले होते. ज्यामुळे त्याची खोली तपासता आली नाही.
दरम्यान दोन वर्षाचा चिमुकला घराच्या बाहेर खेळत असताना तो पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडला. घरच्यांना तो पडल्याची माहिती मिळाल्यावर उशीर झाला होता. स्थानिकांच्या मदतीने मुलाला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात खळबळ उडाली. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, खड्ड्यांभोवती अडथळे लावलेले नव्हते किंवा कोणतेही चेतावणी फलक लावलेले नव्हते.
प्राथमिक तपासात निष्काळजीपणा झाल्याचेही उघड झाले आहे. या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांनी एका अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याएजन्सीने खड्डे खोदले, हे काम कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले होते आणि सुरक्षेच्या मानकांचे पालन का केले गेले नाही, हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहे..
Edited By - Priya Dixit
