अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
यंदा साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार असून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला असून साहित्यप्रेमी वर्गात उत्सहात आनंदाची लाट उसळली आहे. पानिपतकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वास महिपती पाटील हे मराठी साहित्याचे एक प्रमुख नाव आहे.
साहित्य क्षेत्रात विश्वास पाटील हे ऐतिहासिक आणि कथनात्मक कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची पहिली कादंबरी पानिपत (1988) ही पानीपतच्या तिसऱ्या लढाईवर (1761) आधारित असून, मराठ्यांच्या पराभवावरून इतिहासाच्या भूत-वर्तमान-भविष्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे.
या कादंबरीने दोन वर्षांत 20,000 हून अधिक प्रतिया विकल्या आणि वि. स. खांडेकरांसारख्या थोर लेखकांनी त्यांच्या भाषा आणि वर्णनशैलीची प्रशंसा केली. त्यांची दुसरी प्रसिद्ध कादंबरी झाडाझडती 1992) ही विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या जीवनावर आधारित असून, त्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. इतर कादंबऱ्यांमध्ये नागकेशर, मिसळ इत्यादींचा समावेश आहे. गेल्या तीन दशकांत त्यांना 70 हून अधिक पुरस्कार मिळाले, ज्यात इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, नाथमाधव पुरस्कार आणि भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार यांचा समावेश आहे.
साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी निवड करण्यात आली आहे.
2026 मध्ये साताऱ्यात हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे. हे साहित्य संमेलन मराठी साहित्याचे सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ असून या संमेलनाची सुरुवात 1878 साली पुण्याच्या हिराबागेत झाली. या वेळी मराठी ग्रंथकारांच्या पहिल्या संमेलनाचे आयोजन न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या पहिल्या संमेलनात मराठी साहित्याच्या विकासासाठी चर्चा करण्यात आल्या. हे संमेलन पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते.
Edited By - Priya Dixit