1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 फेब्रुवारी 2026 (15:06 IST)

अजित पवारांच्या निधनाला 1 महिना पूर्ण; सुनेत्रा पवारांनी केली भावनिक पोस्ट

sunetra pawar maharashtra first woman deputy CM
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनतेचे लाडके अजित दादा पवार यांचा बारामतीत विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. आज 28 फेब्रुवारी रोजी त्यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. 
जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी ते विमानाने बारामतीकडे जात असताना लँडिंगच्या तयारीत विमान कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
याला आज एक महिना उलटला असून त्यांच्या पत्नी व राज्याच्या पहिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.  ‘एक्स’ या माध्यमावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंना उजाळा दिला.
 
सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, अजितदादा हे केवळ राजकारणी नव्हते, तर माणुसकीची जाण असलेले, लोकांशी जिव्हाळ्याने नातं जोडणारे व्यक्तिमत्त्व होते. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, समाजहितासाठीची अखंड धडपड आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. सत्तेचा उपयोग जनहितासाठीच व्हावा, ही त्यांची ठाम भूमिका होती.
त्यांच्या नेतृत्वशैलीचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, स्वभावाने दिलदार असले तरी निर्णयाच्या क्षणी ते अत्यंत ठाम आणि स्पष्ट भूमिका घेणारे नेते होते. सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन “विकासाचे राजकारण” करण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. त्यांच्या कामातून उभा राहिलेला विकासाचा मार्ग आणि जनतेने दाखवलेला अपार विश्वास हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी ओळख आहे. 
त्या म्हणाल्या, की, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मात्र, त्यांच्या विचारांचा आणि कार्यतत्परतेचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा सतत मिळत राहील. राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ आणि कार्यसंस्कृती यामुळे पुढील वाटचाल अधिक दृढनिश्चयाने करता येईल,असा मला विश्वास आहे. 
अजित पवार यांच्या स्मृती आजही कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या कार्याची छाप राज्याच्या राजकारणावर कायम राहील, अशी भावना व्यक्त करते.
सुनेत्रा पवार पोस्ट
 
जिवाभावाचा माणूस…
 
माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते.
 
त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते, पण…
 
स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे, तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व, अशी त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक समाजघटकाला आधार देत त्यांनी सातत्याने “विकासाचे राजकारण” जपले. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते; पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ मला आणि आपणा सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात.. आपल्या विचारांत, आपल्या कृतीत, आपल्या प्रत्येक कामात त्यांचे प्रतिबिंब कायम दिसत राहील, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्यात.
Edited By - Priya Dixit