नाशिकमध्ये अवघ्या पाचच दिवसात दहा हजार ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवास
राज्यातील ७५ वर्षावरील नागरिकांना एस.टी. बसमधून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. राज्यभरातून या योजनेला ज्येष्ठांचा उदंड प्रतिसाद लाभला आहेच त्यात नाशिक जिल्हा देखील मागे नाही.
नाशिकमध्ये अवघ्या पाचच दिवसात दहा हजार ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे प्रवास करणाऱ्यांमध्ये अर्धे तिकीटाची योजना असलेल्या ६५ वर्षवयावरील ज्येष्ठांपेक्षा ७५ वयावरील ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने ७५ वर्षावरील ज्येष्ठांसाठी राज्य शासनाने योजनेची घोषणा केली होती. दि. २६ ऑगस्टपासून प्रत्यक्ष योजनेला सुरूवात झाली आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच नाशिकमधील ज्येष्ठांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला.
जिल्ह्यातील १३ डेपोंमध्ये योजनेचे लाभार्थी दिसून आले. त्यामध्ये नाशिक डेपोतून मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल १० हजार ७१७ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला तर अर्धेे तिकीटाचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांची संख्या ८००७३ इतकी आहे.