रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (08:13 IST)

झोपडीत झोपलेल्या १० मजुरांना ट्रकने चिरडले;

चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव आयशर ट्रक बुलढाण्यात नांदुरा- मलकापूर रस्त्यालगतच्या झोपडीत घुसला. या झोपडीत झोपलेले १० मजुर या ट्रकखाली चिरडले गेले आहेत. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यु झाला तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगांरांवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ६ जखमींपैकी दोन कामगारांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
 
चिखलदऱ्यातील रहिवाशी असलेले हे मजूर नांदुऱ्यात रस्ता निर्मितीच्या कामासाठी आले होते. प्रकाश बाबू जांभेकर (२६), पंकज तुळशीराम जांभेकर (२६), अभिषेक रमेश जांभेकर (१८) अशी अपघातात निधन झालेल्या तीन मजुरांची नावे असून चौथ्या मजुराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
 
बुलढाण्यात नांदुरा- मलकापूर मार्गावर महामार्गाचे काम चालु आहे. या कामासाठी काही मजूर आले होते. महामार्गाच्या रस्त्याला लागूनच त्यांनी राहण्यासाठी व्यवस्था केली होती. आपल्या झोपडीत हे मजूर रात्री गाढ झोपेत असताना या मार्गावरील भरधाव ट्रक कामगारांच्या झोपडीत घुसला.
 
या झोपडीत एकूण 10 कामगार झोपले होते. त्यापैकी चौघे जागीच ठार झाले तर सहाजण गंभिर जखमी झाले आहेत. परप्रांतिय अदिवासी कामगारांच्या अशा दुर्दैवी मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बुलढाण्यात नांदुरा- मलकापूर मार्गावर दिवस-रात्र ट्रक आणि मोठ्या आवजड वाहनांची ये- जा सुरू असते. तसेच या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचं स्थानिकांनी सांगितले आहे.