शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (08:08 IST)

"या" विद्यमान आमदारांना भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवणार?

मुंबई  :- भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राजकीय विद्यमान 8 आमदारांना उतरविणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. केंद्रात विजयी हॅट्ट्रिक करण्याचा भाजपचा इरादा असून त्यासाठी महाराष्ट्रात मिशन 45 प्लसचा नारा भाजपकडून देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या विविध सर्वेक्षणांमध्ये राज्यात भाजपप्रणित एनडीएला महाविकास आघाडीकडून जोरदार टक्कर दिली जात असल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने अनपेक्षित डाव टाकण्याची तयारी केली असून सध्या विधानसभेत असलेल्या काही दिग्गज नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
 
राजधानी मुंबईसह ठाणे आणि राज्याच्या इतर काही मतदारसंघांमध्ये भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. यामध्ये राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, राम सातपुते, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, संजय केळकर आणि रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.
 
याबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांच्या महाविकास आघाडीने दिलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तुल्यबळ उमेदवार असावेत, यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जाईल, असे समजते.
सध्या आमदार असलेल्या ज्या नेत्यांची चाचपणी लोकसभा निवडणुकीसाठी केली जात आहे, त्यांच्या संभाव्य मतदारसंघाची माहितीही समोर आली आहे. दक्षिण मुंबईतून भाजपच्या तिकिटावर विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लढू शकतात. त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांनाही मुंबईतील एखाद्या मतदारसंघातून संधी दिली जाऊ शकते.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्ध्यातून पक्षाचे उमेदवार असू शकतात. तसेच ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ यंदा भाजप आपल्या पदरात पाडून घेऊन तिथे संजय केळकर किंवा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपने राज्यातील दिग्गजांना लोकसभा लढवण्याचा आदेश दिल्यास महाविकास आघाडीसमोरील आव्हानही वाढणार आहे.