सोमवार, 9 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (10:02 IST)

दहावीची परीक्षा देताय, मग आधार कार्ड अनिवार्य

येणाऱ्या वर्षात जर तुम्ही दहावीची परीक्षा देणार असाल तर तुम्ही आधार कार्ड काढणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरेपर्यंत आधार कार्ड काढलेले नाही अशा विद्यार्थ्यांना आता शाळेतील मुख्याध्यापकांना निकालपर्यंत मी आधार कार्ड काढेन असे हमीपत्र द्यावे लागणार आहे. याबाबतच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.
 
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे काम सध्या सुरु असून त्यासाठी विद्यार्थ्यांना आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यंदापासून राज्य मंडळाकडून नव्या प्रकारचा अर्ज भरुन घेण्यात येणार असून त्यावर जन्मस्थळाबरोबरच आधार क्रमांक देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आधार काढलेले नाही अशा विद्यार्थ्यांचा आधार कार्डसाठी नोंदणी केलेला नोंदणी क्रमांकही ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र ज्यांच्याकडे नोंदणी क्रमांकही नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज तर भरुन घ्यावेत पण या विद्यार्थ्यांकडून निकालापर्यंत आधार कार्ड काढणार असल्याचे हमीपत्रही भरुन घ्यावे अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत. आधार कार्ड नाही म्हणून अर्ज भरला जाणार नाही अशी अडवणूक कोणत्याही प्रकारे शिक्षकांनी व अधिकाऱ्यांनी करु नये अशाही सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
 
दरम्यान इयत्ता दहावीचे अर्ज भरण्याची 16 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबर अशी आहे. तर शाळांनी चलनाद्वारे शुल्क भरायची तारीख 7 ते 14 नोव्हेंबर आहे. यानंतर जर अर्ज भरला तर 7 नोव्हेंबर नंतर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागणार आहे.