शिंदे गटाच्या 11 आमदारांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या
शिंदे गटाच्या 11 आमदारांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगताना सामंत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना भेटण्याचा किंवा बोलण्याचा संबंध येत नाही. आमची भावना स्पष्ट आहे. वर्षानुवर्षे वेळ मागूनही वेळ न देणे. आमदारांच्या मतदारसंघातील अडीअडचणी, विरोधकांकडून होणारा त्रास यातून मार्ग निघावा ही आमदारांची भावना होती. पण त्यावेळी भेटीचा वेळ मिळाला नाही. कोणी वेळ दिला नाही हे सगळयांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधावा असे कोणाच्याही मनात नाही.
अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असतात. आमच्या संपर्कात असतात. मुख्यमंत्री शिंदेचा वाढदिवस होता, तेव्हा मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत होतो. त्यादिवशी उद्धव ठाकरेंसोबतच्या 13 पैकी 10 आमदारांनी शिंदेंना फोन केला. त्यानंतरच्या दोन -तीन दिवसात रात्री दोन नंतर यातील सहा आमदार शिंदेंना भेटून देखील गेले. ही बातमी ऐकून अस्वस्थ झाल्यानेच हा गैरसमज पसरविण्यात येत आहे. उलट दरम्यानच्या काळात मनीषा कायंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला, असे सामंत म्हणाले.