मित्राला मारहाण करून पळवले अन् १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पालघरमधील धक्कादायक घटनेने खळबळ
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका निर्जन रस्त्यावरून आपल्या मित्रासोबत जात असलेल्या १९ वर्षांच्या तरुणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेदरम्यान आरोपींनी तिच्या मित्राला मारहाण करून तेथून पळवून लावले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मदतीसाठी आले अन् हैवान बनले
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र गुजरातच्या उमरगाव येथून दुचाकीवरून परत येत होते. पालघरमधील आमगावजवळ त्यांची दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले.
त्याच वेळी मोटरसायकलवरून आलेल्या तीन जणांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि आपल्या इतर तीन मित्रांनाही तिथे बोलावून घेतले. या सहा जणांच्या टोळक्याने पीडितेच्या मित्राला मारहाण करून तिथून पळवून लावले. त्यानंतर आरोपींनी तरुणीला तलासरी येथील एका निर्जन डाक बंगल्याजवळ नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
तपास आणि पोलिसांची कारवाई
घटनेनंतर कमालीच्या धक्का अन् दहशतीखाली असलेल्या तरुणीने सोमवारी तलासरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तिच्या मित्रानेही पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून एका आरोपीला अटक केली, तर मंगळवारी आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित तीन फरार आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

