1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (15:29 IST)

ऐन सणोत्सवात अहमदनगरमध्ये वीजपुरवठ्यात 2 तासांची कपात सुरु

कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे.
राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसताना नगर मध्ये मात्र वीजपुरवठ्यात 2 तासांची कपात सुरु आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा दोन तास कमी केला असून, शेतीपंपाच्या सिंगल फेजवर तब्बल 15 तासांचे भारनियमन सुरू केले आहे. मात्र गावठाण सिंगल फेजचा वीजपुरवठा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.
राज्यात कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील वीजपुरवठ्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने वीज भारनियमन करण्यात येणार नसल्याचे एकीकडे जाहीर केले असले तरी महावितरण कंपनीने प्रत्यक्षात भारनियमन करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार शेतीपंपांना रात्री 10 तास ऐवजी 8 तास तर दिवसा 8 तासांऐवजी 6 तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन त्याची मंगळवार (दि. 12) पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे.
शेतीपंपांना थ्री फेजवर सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येत होता. त्यात आता मोठी कपात करण्यात आली असून, या सिंगल फेजसाठी तब्बल 15 तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे.शेतीपंपांच्या सिंगल फेजवर यापुढे केवळ रात्री 9 ते सकाळी 6 वा. पर्यंतच वीजपुरवठा सुरू राहणार असून, सकाळी 6 ते रात्री 9 वा. पर्यंत हा वीजपुरवठा तब्बल 15 तास बंद राहणार आहे.विजेच्या तुटवड्यामुळे वीजकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि गावठाणच्या सिंगल फेजवर नियमित वीजपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, या वीज कपातीच्या संकटामुळे नगर तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त होत आहे.