बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (08:22 IST)

राजापुरातील वणव्यात 35 लाखांचे नुकसान

राजापुरातालुक्यातील सागवे-गोठीवरे परिसरात शनिवारी सकाळी लागलेल्या वणव्यात येथील जवळपास 35 शेतकऱयांच्या बागा जळाल्या असून सुमारे 30 ते 35 लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. येथील ग्रामस्थांनी काही बागायती वणव्यापासून वाचवल्या. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. वणवा कसा लागला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
शनिवारी सकाळी अंदाजे 10 वा. पासून गोठीवरे परिसरात मोठा वणवा लागला होता. गोठीवरे फाटा ते ऐरमवाडीपर्यत सुमारे 5 कि.मी. हा वणवा पसरल्याने येथील शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील सुमारे 35 शेतकऱयांची लागती असलेली कलमे जळून खाक झाली. यामुळे सुमारे 30 ते 35 लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. येथील काही शेतकऱयांचे वार्षिक उत्पन्न हे बागायतींवरच अवलंबून असते. बागायती वणव्यात जळून गेल्याने त्यांच्या सुमारे वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून पुढे उभा राहिला आहे.
 
शनिवारी सकाळपासूनच गोठिवरे फाटय़ापासून संपूर्ण डाव्या बाजूला आगीने रूद्र रूप धारण केले होते. ही आग 3-4 तास आधीच आग लागली असावी. पुढील 2-3 तासात आग 5 किलोमीटर दूरवर पसरलेली पाहून लोकांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. परंतु वाऱयाच्या प्रवाहापुढे सर्व हतबल होत होते. अनेकांच्या हापूस आंब्याच्या झाडांचे आगीत नुकसान झाले. अनेकांचे गवताचे भारे जळून खाक झाले. आजूबाजूच्या गावातून आगीचे लोट दिसत होते. दुपारनंतर अथक प्रयत्नाने आग नियंत्रणात आणण्यात गावकऱयांना यश आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील महिला, पुरूषांसह मुलांनी आटोकाट प्रयत्न केल्याने या परिसरातील काही बागांना वाचवण्यात यश आले. शेतकऱयांनी रचून ठेवलेल्या वैरणही जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱयाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor