रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (08:33 IST)

महादेव अ‍ॅप सट्टेबाजीप्रकरणी ५६७ कोटींची मालमत्ता जप्त

महादेव अ‍ॅप सट्टेबाजीप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात ५६७ कोटींची जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे पोलीस तपासात हजारो लोक अद्यापही अ‍ॅपसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महादेव अ‍ॅप सट्टेबाजीप्रकरणी ईडीकडून १९७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, आरोपींनी अ‍ॅपद्वारे ६ हजार कोटी रुपये कमावल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
 
महादेव बुक अ‍ॅप प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीने नुकतेच दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि सिक्युरिटी होल्डिंगसह सुमारे ५६७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडी रायपूरने दाखल केलेल्या १९७ पानांच्या आरोपपत्रात पुढे असे दिसून आले आहे की, सुमारे हजार लोक अद्यापही अ‍ॅपसाठी काम करत आहेत, जे बहुतेक भाड्याने घेतलेल्या व्हिलामधून कार्यरत आहेत.  
 
बहुतेक सट्टेबाजी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून केली जाते आणि एजंट, विविध पॅनल बनवून कमिशन तत्त्वावर कॉल सेंटर चालवत आहेत. महादेव बुक अ‍ॅपचे मुख्य कार्यालय यूएईमध्ये असून, ते मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल चालवतात. केवळ क्रिकेट सट्टेबाजीवरच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणार्‍या निवडणुकांवर सट्टेबाजीसाठीही या अ‍ॅपचा वापर केला जात होता.
 
महादेव बुक अ‍ॅपसाठी काम करणारे बहुतेक कर्मचारी छत्तीसगडचे आहेत, जे सौरभ आणि रवी उप्पल यांना ओळखतात आणि ते दुबई आणि यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत.

यावर्षी ऑगस्टमध्ये महादेव बेकायदेशीर सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) चंद्रभूषण वर्मा यांनी सांगितले होते की, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मित्राने हवाला व्यवहाराद्वारे पैसे मिळवले होते, ईडीद्वारे दाखल आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
आरोपपत्रानुसार वर्मा यांनी अंमलबजावणी संचालनालयाला सांगितले की, नागपूरमधून जमा झालेल्या हवाला रकमेतील काही भाग विजय भाटिया, लक्ष्मीनारायण बन्सल, आशिष वर्मा आणि मनीष बनचोर यांना देण्यात आला. विजय भाटिया हे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र आहेत. आशिष वर्मा आणि मनीष बनचोर हे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी  आहेत.महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी ईडी सातत्याने छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे.
 
आता याप्रकरणी बॉलिवूड रडारवर आले आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरसारख्या अनेक मोठ्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचे होते. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे.
 
सौरभने त्याचा मित्र रवी उप्पलसोबत ’महादेव ऑनलाईन अ‍ॅप’ सुरू केले होते. या अ‍ॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आले आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचे सर्वात मोठेे नेटवर्क उघड झाले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor