भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय, यापुढे सातबारा उतारे बंद होणार
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. पण हा निर्णय फक्त वाढत्या शहरांसाठी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आता शहरात शेतजमिनीच शिल्लक राहिलेल्या नाहीत त्याठिकाणचा सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.
यामुळे पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्तावर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामधे या प्रणालीचा वापर करून माहिती जमा केली जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली आहे.