1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (09:10 IST)

नाशिकला स्पर्धा परीक्षेच्या नैराश्‍यातून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

suicide
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आलेल्या तणाव आणि नैराश्यातून २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. करिअरसाठी धडपडणाऱ्या तरुणाच्या आत्महत्येने पाथर्डी फाटा परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.
 
शुभम भास्कर महाजन (२२, रा. बिल्डिंग नंबर २, पोलिस वसाहत, पाथर्डी फाटा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुभम गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता. आयोगाचा एक पेपर दिला असता, तो पेपर त्याला अवघड गेल्याचे समजते.
 
अभ्यास करताना तणाव येत असल्याचे त्याने घरी कळत-नकळत सांगितले होते. दरम्यान, शुभमने शनिवारी (ता. ८) सायंकाळी राहत्या घरी असताना हॉलमध्ये बेटशीटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. माहिती कळताच महेश कचरे यांनी इंदिरानगर पोलिसांना घटना कळविली.
 
इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे, सहायक उपनिरीक्षक चव्हाण व हवालदार गारले घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत शुभम याचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. त्याची बहिण विवाहित असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात अंमलदार आहे. पाथर्डी फाटा येथील पोलिस वसाहतीत तो बहिणीकडे आई-वडिलांसह राहत होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार गारले करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor