शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (10:03 IST)

आमदार लांडगे यांच्यासह ४० ते ५० जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

विवाह समारंभातील मांडव डहाळे कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा झाला आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याची राज्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.
 
दरम्यान, आमदार लांडगे यांची कन्या साक्षी आणि व्यावसायिक नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद भोंडवे यांचा विवाह तीर्थक्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मंदिरासमोर सोमवारी (दि.३१) अत्यंत साधेपणाने पार पडला. मात्र, तत्त्पूर्वी विवाहाच्या पूर्वीसंध्येला झालेल्या मांडव डहाळे समारंभात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्यामुळे विवाह समारंभास गालबोट लागले.
 
भोसरी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सचिन लांडगे, अजित सस्ते, कुंदन लांडगे, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी धावडे, सुनील लांडे, नितीन गोडसे, प्रज्योत फुगे यांच्यासह ४० ते ५० लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ३३५ / २०२१ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१, महाकोविड १९ उपाययोजना २०२० कलम ११ आणि भारतीय दंड विधान कलम ५८८, २५९ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार कारवाई केली आहे.
 
मांडव डहाळे कार्यक्रमात उपस्थितांसोबत ठेका धरल्यानंतर आमदार लांडगे यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले आहे. तसेच, गर्दी जमवून कोरोना प्रसार होईल, असे वर्तन केले आहे, असा आरोप पोलिसांचा आहे. राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आमदार, खासदार, श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरीबांना वेगळा न्याय का? असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित करण्यात येत होता.
वास्तविक, हा विवाह सोहळा ६ जून रोजी होणार होता. राजस्थान किंवा गोवा येथे हा सोहळा पार पडणार होता. मात्र, लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे विवाह सोहळा आयोजित करण्यात मर्यादा आल्या होता. त्यामुळे मांडव डळाळे ३० तारखेला मांडव डहाळे आणि ३१ तारखेला विवाह असे नियोजन करण्यात आले होते.
 
याबाबत आमदार लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे म्हणाले की, मांडव डहाळे समारंभासाठी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली होती. नियमानुसार २५ मोजक्या आप्तेष्ठांना निमंत्रित केले होते. कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही आनंद साजरा केला. मात्र, समारंभ ठिकाणी काही कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित राहीले. त्यामुळे गर्दी निर्माण झाली. कोरोना नियमावली अर्थात सोशल डिस्टंन्सींगच्या नियमाचे उल्लंघन झाले. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे हा आमचा हेतू नव्हता. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे. प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईची पूर्तता आम्ही करणार आहोत. प्रशासनाला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही सचिन लांडगे यांनी म्हटले आहे.