शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 1 जून 2021 (08:10 IST)

कोरोना काळातही मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही – मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि देखणे झाले आहे. कोरोनाचा धोका अजुनही टळला नाही गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले.
 
डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल 1 अणि 2) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाणपुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 
 
 ते म्हणाले, आजचा कार्यक्रम हा या महानगराला दिशा आणि वेग देणारा आहे. वर्षभराहून अधिक काळ  कोरोनाचे सावट राज्यावर आहे. मात्र याकाळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबईसारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय, असेही त्यांनी सांगितले. विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले असे सांगतानाच मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
सांघिक यश :
मुंबई आधुनिकतेची कास धरणार शहर असलं तरी त्याला प्राचिनतेचा वारसा आहे. आगळंवेगळं विविधतेने नटलेल्या शहरात होत असलेली विकास कामे हे सांघिक यश असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीच्या गर्दीचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही गाफील राहीलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा देतानाच कोरोना काळात विकास कामांचा पुढचा टप्पा वेगाने पार पाडावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
 
राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही – उपमुख्यमंत्री
पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणे राज्य शासनाचे सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राला देशात प्रगतीशील राज्य बनविण्यामध्ये मुंबईचा मोठा वाटा आहे. राज्याचा प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानी वेगवान ठेवण्याच काम विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून होत आहे. गेल्या सव्वा वर्षांत कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ अशी नैसर्गिक संकटे आली मात्र त्यावर मात करीत राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही.
 
राज्य शासनाची यंत्रणा किती गतीने काम करतेय याचं उदाहरण देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दिवसात ३० किमी लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्याचे काम झाले असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत देखील रात्रीच्या बारा तासात सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. कोरोनाच्या संकटला दूर करायचं तर नियमावलीचं पालन होणं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वादळात मोठी झाडं उन्मळून पडल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली त्यातून झालेल्या चर्चेनुसार हेरिटेज ट्री हा संकल्पना महाराष्ट्र राबविणार असल्याचे  पवार यांनी सांगितले.