गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (07:31 IST)

नाशिक :अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई; दोन बसमधून हजारो किलो भेसळयुक्त मावा जप्त

नाशिक :- परराज्यातून भेसळयुक्त  आलेला हजारो किलो मावा अन्न व औषध प्रशासन विभागाने आज सकाळी छापा टाकून जप्त केला आहे. यामुळे नाशिकमध्ये असणारी मिठाई ही भेसळयुक्त माव्याचे असल्याचे समोर आले आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.
 
याबाबत माहिती अशी की, नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी याच विभागाकडून द्वारका येथे छापा टाकून खासगी बसने आलेला मावा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आज मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातून दोन खासगी बसमधून द्वारका परिसरात असलेल्या खासगी ट्रॅव्हल बसच्या कार्यालयात भेसळयुक्त मावाच्या बॅग उतरणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती.
 
त्यनुसार  या विभागाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने विभागाचे अधिकारी उदय लोहकरे, अमित रासकर पाटील व अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सापळा लावला. सकाळच्या वेळी गुजरातवरून आलेल्या दोन खासगी बसमध्ये मावा असल्याचे समोर आले. त्यानंतर काही वेळाने हा मावा येथील ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात उतरवला जात असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला.
 
दरम्यान नाशिकमध्ये भेसळयुक्त मावा वापरून मिठाई बनविण्याचे काम सुरू असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये विक्री होणारी मिठाई ही भेसळयुक्त आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.  हा मावा कोणासाठी आला होता, याचाही तपास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने केला जाणार आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor