मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2023 (08:35 IST)

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय समिती नेमावी; मुख्यमंत्री

eknath shinde
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंगळवारी विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.  शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या उद्दिष्टाने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून ६ हजार कृषि फीडर्स सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत, असे सांगून शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलासाठी वीज पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
सव्वा दोन लाख सौर कृषि पंप देण्याचे उद्दिष्ट असून गेल्या वर्षी ७५ हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. ज्यांना वीजेची जोडणी नाही त्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्याचे धोरण असून ज्यांच्याकडे वीजजोडणी आहे, त्यांनी मागणी केल्यास त्यांनाही सौर कृषिपंप देण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश  शिंदे यांनी बैठकीत  दिले. केवळ एक रुपया भरुन पंतप्रधान  पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय अर्थसंकल्पात घेतला असून विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे.  त्यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माग़ेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक अशा विविध योजना शासन राबवित  असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. .
 
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला जागतिक बॅंकेने मान्यता दिली आहे. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल.  पंतप्रधान  कृषि सन्मान निधी योजनेत राज्य सरकारच्या  अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी  महा सन्मान  निधी योजना जाहीर केली आहे.  यात प्रतिवर्ष प्रति शेतकरी ६ हजार रुपये अतिरिक्त राज्य सरकारकडून  देण्यात येणार आहे.  त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  अवकाळी, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये वाटप केले आहे.  सिंचनाच्या २८ योजना मंजूर केल्या असून  त्यातून ५ लाख हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही एकनाथ  शिंदे यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor