शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (11:35 IST)

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : निकाल कधी येणार? 5 प्रश्न आणि 5 उत्तरं

eknath shinde uddhav
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं 16 फ्रेब्रुवारीपासून राखून ठेवला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून हा खटला प्रलंबित आहे.
 
20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनं सुरू झालेला हा सत्तासंघर्ष अखेर कोर्टात गेला. त्यानंतर 23 ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची व्यप्ती आणि गंभीरता लक्षात घेता ते 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवलं.
 
आता सुरू असलेल्या आठवड्यातच याचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
कोण कोण कोर्टात गेलंय?
या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे गट हे प्रमुख याचिकाकर्ते आहेत. शिवाय वेगवेगळ्या घटकांनीसुद्धा कोर्टात धाव घेतली आहे. त्यात काही वकील आणि कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश आहे.
 
शिवाय सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारलासुद्धा प्रतिवादी केलं आहे.
 
कोणकोणत्या याचिका आहेत?
या प्रकरणी एकूण 4 प्रमुख याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील पहिली याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे जी 16 आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी आहे.
 
दुसरी याचिका बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी करणारी उद्धव ठाकरे गटाची याचिका आहे.
 
तिसरी याचिका उद्धव ठाकरे गटातल्या 14 आमदारांच्या निलंबनासंदर्भातली आहे.
 
तर चौथी याचिका सुभाष देसाई यांची 3-4 जुलैचं विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी करणारी आहे
 
कोर्टानं काय काय निरीक्षणं नोंदवली आहेत?
या प्रकरणात घटनात्मक पेच दिसत असल्याचं निरीक्षण सरन्याधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नोंदवलंय.
 
तसंच या प्रकरणाला नेबाम रेबिया प्रकरणाचा निकाल लागू होतो किंवा नाही, याचा विचार करूनच या प्रकरणाचा निकाल कोर्टाकडून देण्यात येईल.
 
घटनापीठानं फेब्रुवारी महिन्यात याबाबत घेतलेल्या सलग सुनावणीमध्ये वेगवेगळी मतं आणि निरीक्षणं नोंदवली आहेत. तसंच महेश जेठमलानी, कपिल सिब्बल, हरीश साळवे, अभिषेक मनु सिंघवी,नीरज किशन कौल आणि मणिंदर कौल यासारख्या देशातल्या नामवंत आणि ज्येष्ठ वकिलांनी या प्रकरणी युक्तिवाद केला आहे.
 
घटनापीठात कोण कोण आहेत?
खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ सुनावणी करत आहे. त्याशिवाय त्यांच्या बरोबर न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिंहा यांचा समावेश आहे.
 
पाच न्यायाधीशांचं हे घटनापीठ आहे. या प्रकरणाचा निकाल केवळ सध्यापुरता मर्यादित नसून भविष्यातही याचा संदर्भ दिला जाईल, त्यामुळे हे प्रकरण आणखी मोठ्या खंडपीठाकडे द्यावं अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी होती
 
निकाल कधी येणार?
या घटनापीठातले न्यायाधीश एम. आर. शहा हे येत्या 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी घटनापीठ त्यांचा निकाल देण्याची शक्यता आहे. 15 मे रोजी सोमवार आहे त्यामुळे त्या दिवशी किंवा मग 8 मे ते 12 मे दरम्यान या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे.
Published By -Smita Joshi