1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2024 (16:00 IST)

पुण्याइतकंच जळगावात भीषण 'हिट अँड रन', आईसह दोन मुलांना कारनं उडवलं

पुण्यात अल्पवयीन आरोपीने दोन जणांना चिरडून मारल्याची घटना ताजी असतानाच जळगावमध्येही हिट अँड रनचं एक प्रकरण समोर आलं आहे.
 
या प्रकरणात वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली, ज्यामध्ये आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला. आरोपी मुलं ही बिल्डर आणि राजकीय व्यक्तींशी संबंधित आहेत.
 
या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांविरोधात रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. तसंच, बिल्डर आणि राजकीय व्यक्तींची मुलं असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला.
 
पुण्यातील प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता जळगाव हिट अँड रन प्रकरणीही कारवाई झाली आहे.
 
प्रकरण घडल्यानंतर तब्बल 17 दिवसांनी कारवाई करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 
शुक्रवारी (24 मे) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
जळगाव तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रामदेववाडी गावाजवळ 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली.
 
बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार हे तरूण या कारमध्ये होते. अर्णव कौल गाडी चालवत होता.
 
त्यांच्या गाडीत गांजाची पाकिटंही आढळली होती.
 
कारची धडक बसून मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय-30 वर्षे), मुलगा सोमेश सरदार चव्हाण (वय-2 वर्षं), सोहम सरदार चव्हाण (वय- 7 वर्षं ) आणि भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय-12) यांचा समावेश आहे.
 
वत्सला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या.
 
या घटनेत दुचाकीला धडक देणाऱ्या कारमधील दोन्ही तरूणही जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते.
 
अर्णव अभिषेक कौल याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईला हलवण्यात आले होते, तर अखिलेश संजय पवार याच्या रक्ताचे नमुने जळगावमध्ये घेण्यात आले.
 
दोघेही मुंबईत उपचार घेत होते. दोघांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे.
 
पोलिसांची कारवाई
पुणे अपघात प्रकरण चर्चेत आल्यानंतर या तपासाची सूत्रं पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून काढून घेत पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्याकडे देण्यात आली.
 
गावित यांनी 21 मे रोजी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहात होते. पोलिसांवर कोणताही दबाव नसून तक्रार मिळाल्यानंतर लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव मधील MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं गावित यांनी सांगितलं.
 
या अपघात प्रकरणी तक्रार नंबर 310/25 नुसार नोंद असून सदोष मनुष्यवधाचा म्हणजेच IPC 304, व IPC 379,285,427 आणि MPDA मादक द्रव्ये बाळगणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 
Published By- Priya Dixit