कायद्याचा दुरूपयोग करून केंद्रीय यंत्रणाकडून कारवाई- नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं गुरूवारी पहाटे धाड टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. ईडीच्या या धाडीनंतर नाना पटोले यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार हल्ला चढवलाय. यावेळी कायद्याचा दुरूपयोग करून केंद्रीय यंत्रणाकडून कारवाई केली जाते असा अशा शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
नाना पटोले यांनी मुंबईत परिषद घेत, मोदी सरकार आणि देशाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शक्तींविरोधात मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. अशा व्यक्तींचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण आणि निमगडे प्रकरणात सतीश उके यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच सतीश उके यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याकडील फाईल्स जप्त करण्यात आल्या. ईडीच्या कायद्यात कोणावर कारवाई करावी, हे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे नियम डावलून ईडीचा गैरवापर सुरु आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. भाजपच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले.